⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

१४ वाळू गटांची जानेवारीत होणार लोकसुनावणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । जिल्ह्यातील प्रस्तावित १४ वाळू गटांबाबत २० व २१ जानेवारी रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणी घेण्यात येणार आहे. या सुनावणीत पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संस्था, विस्थापित होणाऱ्यांना लेखी आक्षेप नोंदवता येतील. पर्यावरणविषयक सूचना, विचार, टीकाटिप्पणी तसेच आक्षेप नाेंदवण्यासाठी ही जाहीर लोकसुनावणी होणार असून तशी तयारी सुरू झाली आहे.

अपर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील १४ प्रस्तावित वाळू गटांच्या पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे. भारत सरकार, पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार १४ प्रस्तावासंदर्भात पर्यावरणविषयक सूचना, विचार, टीकाटिप्पणी तसेच आक्षेप नाेंदवण्यासाठी ही जाहीर लोकसुनावणी होणार असून तशी तयारी सुरू झाली आहे.

असे आहेत वाळू गट, अशी होणार सुनावणी
तापी नदीवरील पातोंडी व पिंप्रीनांदू (ता. मुक्ताईनगर), सुकी नदीवरील वडगाव व आंदळवाडी, भोकर नदीवरील केऱ्हाळे बुद्रुक, पातोंडी, तापी नदीवरील धुरखेडा, दोधे ता. रावेर, पांझरा नदीवरील तांदळी, तापी नदीवरील धावडे (ता. अमळनेर), गिरणा नदीवरील बाभूळगाव १, बाभूळगाव २ ता. धरणगाव, तापी नदीवरील भोकर व गिरणा नदीवरील पळसोद (ता.जळगाव) या गावातील वाळू गटांचा समावेश आहे. २० जानेवारी रोजी लोकसुनावणी मुक्ताईनगरसाठी सकाळी ११ वाजता मुक्ताईनगर पंचायत समिती कार्यालय, रावेरसाठी दुपारी २.३० वाजता तहसील कार्यालय रावेर येथे लोकसुनावणी होईल. २१ जानेवारी रोजी जळगाव तालुक्यासाठी सकाळी ११ वाजता अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय, धरणगावसाठी दुपारी २ वाजता धरणगाव तहसील कार्यालय, अमळनेरसाठी दुपारी ४ वाजता तहसील कार्यालयात जनसुनावणी होणार आहे.