जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२५ । जळगाव जिल्ह्यात गुरांवर होणाऱ्या लम्पी आजाराने थैमान घातले असून यावर उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने तात्काळ लसीकरणास सुरुवात करण्यात आली असली तरी यात एका गुराचा लम्पीमुळे मृत्य झाल्याची नोंद झाली. यातच जिल्ह्ह्यातील काही गुराच्या बाजारावर जिल्हाधिकारी यांनी पुढील आदेश येईपर्यंत बंदी घातली आहे.

जळगाव जिल्ह्यात लम्पी या विषाणूजन्य आजाराचा प्रसार वाढत चालला आहे. जिल्ह्यातील एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, धरणगाव, भडगाव, चोपडा, रावेर या तालुक्यातील २८ गावांमध्ये लम्पीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रोगप्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमनुसार आदेश काढले आहेत.

गुरांचे सार्वजनिक बाजार बंद
कासोदा, पारोळा, धरणगाव व रावेर येथील गुरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. तसेच आंतरराज्य, आंतरजिल्हा व आंतर तालुका पशु वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात यावी. फक्त लंपी प्रतिबंधक लस टोचून २८ दिवस पूर्ण झालेल्या जनावरांस वाहतुकीस प्रमाणपत्रासह परवानगी दिली जाईल. असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पशुधनाच्या आरोग्यास बाधा पोहोचू नये म्हणून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.








