जळगाव लाईव्ह न्यूज । आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम राबविली. जामनेर, पहूर आणि फत्तेपूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत व्यापक कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. या कारवाईमुळे संशयित आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली.

या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणी तपासणी करत एकूण १८९ आरोपी शोधून काढले. संबंधितांची चौकशी व तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. आगामी सण-उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी ही मोहीम राबविली.

दरम्यान, अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधातही पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच, संशयास्पद वाहनांवरही पोलिसांनी कारवाई केली. ५२ मोटारसायकल आणि एका रिक्षाची तपासणी करण्यात आली असून, संबंधित वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.
सण-उत्सवांच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त आणि गस्त वाढविण्यात येणार आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.









