⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जळगाव शहराच्या विकासासाठी ३०० कोटींचा निधी द्या : महापौरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेवर गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकविण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव दौरा करीत नागरी सोय सुविधांसाठी कोणताही निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, शिवसेनेत सध्या फूट पडली असून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झाली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर जळगाव दौऱ्यावर प्रथमच आलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन यांनी जळगाव विमानतळावर भेट घेतली. शहराच्या विकासासाठी ३०० कोटींचा निधी देत तो तात्काळ वर्ग करावा तसेच इतर मागण्या देखील पूर्ण कराव्या, असे साकडे महापौरांनी निवेदनाद्वारे घातले.

महापौर जयश्री महाजन यांनी दिलेले पत्र जसेच्या तसे…
समस्त जळगावकरांच्यावतीने आपली बहिण व महापौर या नात्याने मी आपले मन:पूर्वक स्वागत करते. गतवर्षी दि. १० जुलै २०२१ रोजी आपण नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून जळगावी आलेला होतात व जळगाव शहर महानगरपालिकेत आपण आम्हाला मार्गदर्शन केलेले होते. ज्यामध्ये जळगावचे रस्ते (मुख्य तसेच कॉलनी व वाढीव परिसरातील) तसेच नागरी सोयी सुविधांसाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही, असे सांगून मेहरुण तलाव हा पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे ही आपण आम्हाला आश्वासित केलेले होते. याअनुषंगाने आपण आता मुख्यमंत्री म्हणून तथा या राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून जळगाव शहराच्या प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी हा तात्काळ मंजूर करून वर्ग करावा, ही ५ लाख जळगावकरांच्यावतीने आग्रहाची नम्र विनंती.

तसेच जळगाव शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बॉटेनिकल गार्डन, महानगरपालिकेतील कर्मचारी भरती, शहरातील सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा प्रकल्प आदी विषयासाठी सुद्धा आपले मार्गदर्शन प्राप्त होवून निधी मिळावा, ही आपणास नम्र विनंती. शेषकुशल, धन्यवाद!
आपली नम्र शिवसैनिक, सौ. जयश्री सुनिल महाजन
महापौर जयश्री महाजन यांनी जळगावकरांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पत्र देत आपल्याच आश्वासनांची आठवण करून दिली आहे. पुढील दहा महिन्यात जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूक येणार असून निधी दिल्यास शिवसेना-भाजपचा फायदा होणार आहे तर निधी अडविला किंवा नाकारल्यास शिवसेनेकडून त्या विषयाचे भांडवल केले जाईल हे निश्चित आहे.