⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

‘व्हाईस ऑफ मिडिया’ संघटनेतर्फे पत्रकाराला बेकायदा दिलेल्या नोटीसचा निषेध

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । धरणगाव तालुक्यातील पत्रकाराला दिलेल्या नोटीसचा निषेध व्यक्त करत धरणगावचे तहसीलदार नितीन देवरे यांच्यावर कारवाई करा, अशा आशयाचे निवेदन आज ‘व्हाईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, खोटे दस्तावेज सादर करीत टोकरे कोळीचे बनावट जात प्रमाणपत्र धरणगाव तहसील कार्यालयाने जारी केल्याचा गंभीर आरोप मुक्ताईनगरचे माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय संतोष कांडेलकर यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. धक्कादायक म्हणजे त्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे एकाने ग्रामपंचायतचे सदस्य पद भुषविण्यात आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले असल्याबाबतची माहिती कांडेलकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. याबाबत एरंडोल उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून धरणगाव तहसीलदार यांना महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. परंतू ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांचे दुय्यम अधिकारी चौकशी कशी करतील ?, असा सवाल मुख्य तक्रारकर्ते श्री.कांडेलकर यांनी उपस्थित केला होता.

याच संदर्भातील बातमी सर्व पत्रकारांनी छापली होती. हीच बातमी दैनिक लोकमतमध्ये धरणगाव येथील पत्रकार कल्पेश महाजन यांनी दि. ४ / १० / २२ रोजी प्रकाशित केली. सदर बातमी प्रकाशित केल्याचा वैयक्तिक राग मनात धरून धरणगाव तहसीलदार नितीन देवरे यांनी पत्रकार कल्पेश महाजन यांना अब्रुनुकसानीची नोटीस तत्काळ धरणगाव तलाठी आणि कोतवाल यांना तातडीने पाठवून पत्रकार कल्पेश महाजन यांच्या घरी पाठविले. कल्पेश महाजन घरी नसतांना तलाठी यांनी कल्पेश महाजन यांना घरावर नोटीस चिपकाविण्याची धमकी दिली.

वास्तविक तहसीलदार नितीन देवरे यांनी सदर बातमी व्यकीशः व्यक्तीद्वेष घेत पत्रकारास नोटीस देण्याचा कुठलाही संबंध नसतांना पत्रकारास नोटीस दिली आहे. कारण धरणगावात लोकमतचे दोन प्रतिनिधी आहेत. त्यामुळे संबधित बातमी कोणत्या पत्रकाराने पाठवली?, याची लोकमत कार्यालयकडून कोणतीही माहिती न घेता कल्पेश महाजन यांना दिलेली नोटीस म्हणजे तहसीलदार श्री. देवरे यांच्याच मनात संबधित पत्रकाराविषयी आकस असल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, पीआरबी कायद्यानुसार कोणत्याही वृत्तपत्रात प्रसारित होणाऱ्या बातमीची जबाबदारी हि संपादकाची असते. तरीही सदरची नोटीस पत्रकारास देणे म्हणजे हे व्यक्ती द्वेष असल्याचे दिसून येते. पीआरबी कायद्यानुसार बातमीची जबाबदारी संपादकांची असते, असे वृत्तपत्रात दररोज प्रेस लाईनमध्ये प्रकाशित केलेले असते. तरी देखील पत्रकाराला नोटीस पाठवणे, गैरकायदा कृत्य आहे. वजा पत्रकाराला धमकावण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया ‘व्हाईस ऑफ मिडिया’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जेनवाल यांनी दिली. यावेळी व्हाईस ऑफ मिडिया’ संघटनेचे उर्दू विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, जिल्हाकार्याध्यक्ष तथा पुण्य नगरीचे संपादक विकास भदाणे, साईमतचे संपादक प्रमोद बर्हाटे, विजय वाघमारे, रवींद्र नवाल, साईमतचे वृत्तसंपादक छगनसिंग पाटील, मौलाना रिजवान, तय्यब पटेल, आनंद शिंपी हे उपस्थित होते.