⁠ 
शुक्रवार, मार्च 1, 2024

दुर्दैवी! पाण्याची मोटार लावताना शॉक लागून महिलेचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । 11 फेब्रुवारी 2024 । धरणगाव तालुक्यातील दोनगाव खुर्द येथे पाण्याची मोटार लावत असताना विजेचा धक्का लागून विवाहितेचा मृत्यू झाला. विजया राहुल पाटील (वय २४, रा. दोनगाव खुर्द ता. धरणगाव) असे मयत विवाहितेचे नाव असून याबाबत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे विजया राहूल पाटील या महिला आपल्या पती व दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. विजया पाटील यांचे पती राहुल हे सेंट्रिंग काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी १० फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास नळाचे पाणी आले होते. त्यावेळेला पाण्याची मोटार लावण्यासाठी गेलेली विवाहिता विजया पाटील यांना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी सदर विवाहितेला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले आहे. यानंतर कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. याघटनेबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.