तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात; शेतकऱ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा

मार्च 4, 2026 4:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । हंगाम २०२५-२०२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत दरानुसार नाफेड व एनसीसीएफ मार्फत राज्यात तूर व हरभरा (चना) खरेदी करण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तेलबिया व कडधान्य खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांची राज्य नोडल संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

harbhara-tur

राज्यात तूर पिकासाठी दि. २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शासकीय आधारभूत खरेदीकरीता ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र तूरीचा सध्याचा बाजारभाव व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन नाफेड व एनसीसीएफ यांच्या विनंतीनुसार तूर नोंदणीसाठी दि. २४ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शासनाच्या आदेशानुसार हरभरा (चना) खरेदीसाठी दि. १ मार्च ते दि. ३१ मार्च २०२६ या कालावधीत शेतकरी नोंदणी करण्यात येणार आहे. दि. १ मार्च २०२६ पासून पुढील ६० दिवस प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नाशिक विभागात हंगाम २०२५-२०२६ मध्ये तूर व हरभरा खरेदीसाठी एकूण ५६ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी नाशिक जिल्ह्यात ११, अहिल्यानगर जिल्ह्यात ३१, धुळे जिल्ह्यात २ तर जळगाव जिल्ह्यात १२ खरेदी केंद्रे कार्यरत आहेत.

सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, आपल्या जवळील मंजूर खरेदी केंद्रावर जाऊन शेतमालाची नोंदणी करावी व कमी दरात विक्री टाळून शासकीय आधारभूत किंमत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांच्या वतीने उपसरव्यवस्थापक, विभागीय कार्यालय, नाशिक यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now