जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । धरणगाव येथील पी.आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.बी.एन.चौधरी यांचा औदुंबर साहित्य रसिक मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात, “अक्षर सन्मान” करण्यात आला.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तमराव कांबळे तसेच उद्घाटक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रा.चौधरी यांना स्मृतीचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सर्जेराव जिगे, डॉ. केशव देशमुख, माजी आमदार महेंद्रसिंह पाटील, अमित पाटील, अध्यक्ष ॲड.मोहन शुक्ला, प्रा.वा.ना.आंधळे, विलास मोरे, अरुण माळी आदी उपस्थित होते.
प्रा.चौधरी यांच्या वाड्मयीन कर्तृत्वाचा मला सदैव सार्थ अभिमान वाटतो असे डॉ. श्रीपाल सबनीस या प्रसंगी म्हणाले. प्रा. चौधरी हे सारस्वतांच्या मांदियाळीतील प्रतिभासंपन्न वारकरी म्हणून पंचक्रोशीत ज्ञात आहेत. समाज प्रबोधनाची कास धरत, त्यांच्या लेखणीने खान्देशसह महाराष्ट्रात मनामनावर आपली पकड दृढ केली आहे, असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष ॲड.मोहन शुक्ला यांनी गौरवपत्र देतांना केले. यावेळी पी.आर.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजयशेठ पगारिया, प्राचार्य डॉ. टी. एस. बिराजदार, मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, डॉ. मिलिंद बागुल, वि.दा.पिंगळे, गणेश सुर्यवंशी उपस्थित होते.