अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता; भारतात सुकामेव्याच्या दराचा भडका, वाचा आजचा भाव
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२१ । अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर तेथून निर्यात होणाऱ्या विविध वस्तूंवर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानातून भारतात येणारा सुकामेवा, मसाले पदार्थांची आवक बंद झाली आहे. या जागतिक घडामोडींचा एकत्रित परिणाम सुकामेव्याच्या भावात वाढ झाली आहे. येऊ घातलेल्या दिवाळीत हे दर किमान १५ ते २५ टक्के वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोरोना काळात सुक्यामेव्याच्या किमतीत घसरण झाली होती. यामुळे अनेकांनी इम्युनिटी वाढविण्यासाठी सुक्यामेव्याचा उपयोग केला. सहाशे ते सातशे रुपये किलोने बदाम, काजू उपलब्ध होते. मात्र, आता अफगाणिस्तान तालिबानने हाती घेतल्यानंतर भारतात निर्यात होणारे सुकामेवा, मसाल्यांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे भारतात सुकामेव्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. भारतात दिवाळी हा मोठा सण असल्याने बड्या पुरवठादारांनी आहे तो माल साठवणूक करण्यावर भर दिल्याने प्रत्यक्षात बाजारात दिवाळीत हे दर १५ ते २५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.
ऑस्ट्रेलिया असू शकतो पर्याय
सुकामेवा ऑस्ट्रेलियावरूनही भारताला आयात करता येणार आहे. मात्र, अफगाणिस्तानने निर्बंध घातल्याने भारतात सुक्यामेव्याच्या दरात वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलिया या परिस्थितीचा फायदा घेऊन सुक्यामेव्याच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातून आता लागलीच सुकामेवा आयात करता येणार नाही. मात्र, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात तेथे सुक्यामेव्याची नवीन उत्पादने येतील. तेव्हा त्याची भारतात आयात करता येऊ शकते, अशी माहिती दाणाबाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.
सुक्यामेव्याचे दर असे…
प्रकार: (प्रतिकिलो)
बदाम- पूर्वीचे दर-७००, आताचे दर ११००
काजू- पूर्वीचे दर ६५०, आताचे दर- १०००
खारीक- पूर्वीचे दर १५०, आताचे दर-२००
पिश्ता- पूर्वीचे दर ७००, आताचे दर- १२००