⁠ 
रविवार, मे 19, 2024

महिलादिन विशेष : भाग्यश्री कुळकर्णी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

माझ्या पाठीमागे उभी झाशीची राणी

जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । ‘माझी आई’ हा निबंध कधीतरी शाळेत लिहिला असेल. पण तेव्हा ही आपली आई आहे एवढेच माहिती होते. आज आईवर लिहायचे तर आई पूर्णतः माहिती आहे. आई अनुभवली आहे. आईसोबत आनंदी जगणे सुरू आहे. आज महिलादिनी आईविषयी लिहिताना मला आईचे नियम, स्वभाव, विचार याविषयी सर्व काही माहिती आहे. पण आईविषयी जेव्हा वेगळा विचार करते तेव्हा न उलगडलेल्या अनेक गोष्टी समोर येत जातात.

कधी कधी विचार करताना लक्षात येते की, काेणती बाई आजपर्यंत कधीही लग्नाच्या ३७ वर्षाच्या काळात एकदाही स्वत:साठी साडी आणायला दुकानात गेली नसेल. खास करून जी स्वत: स्वयंपूर्ण आहे. आर्थिकदृष्ट्या कमावणारी आहे. माझी आई आजपर्यंत कधीच दुकानात स्वतःसाठी काहीही विकत घ्यायला गेली नाही. अगाेदर बाबांनी आणत होते. मी लवकर करतीधरती झाले. मग मीच आणायला लागले. अगदी मी देईन ती साडी ती वापरणार. काेणतीही चाॅइस तिला नसतो. खरे सांगायचे तर आई सर्वगुण संपन्न आहे. फारच कष्टाळू आणि मेहनती आहे. आईचा बाबांसोबतचा प्रवासही तसा कष्टाचाच राहिला. संसारात अनेक प्रसंगांना ती सामोरी गेली. पण बाबांशी विवादाचा प्रसंग मी पाहिला नाही.

अलिकडे मला नेहमी वाटते आईच्या कलागुणांना आम्ही काेणीच न्याय दिला नाही. माहेरी तेथील आणि नंतर आमच्या कुटुंबाचे करायला ती झटत राहिली. आई कलागुणांनी संपन्न आहे. ३५ वर्षांपासून तिचा गृहउद्याेग सुरु आहे. ती माझ्यापेक्षाही जास्त व्यस्त असते. खाण्यापिण्याचे करण्यात सुग्रण आहे. काेणतेही पदार्थ सांगा ती हमखास करणार. पापड, बिबडी सारख्या पदार्थात तर तीची मास्टरी आहे. उत्तम शेवया ती करते. लग्नाच्या सिझनमध्ये साखरेचे रुखवत ती करुन देते. त्यालाही प्रचंड मागणी असते. दिवाळीत फराळाचे असतेच. हिवाळ्यात लग्नसराई आणि उन्हाळ्यात घरगुती पदार्थ. अशी बाराही महिने ती व्यस्त असते. आईची एक खासियत. काेणताही पदार्थ बिघडला तर ताे चांगला कसा करायचा असे पाक कौशल्य तिला अवगत आहे.

आई उत्तम शेतकरी देखील ती आहे. बाबांचा तापट स्वभाव आहे. त्यांना सगळे हातात द्यावे लागते. तरीही आई रोजची धावपळ करीत सांभाळते. आई माझ्या आयुष्यात झाशीची राणी आहे. ती बाळाला पाठीशी लावून लढली. ही माझ्या पाठीशी राहून लढायला शिकवते. अगदी नव्या व्यवसायात मला पाऊल ठेवायचे असताना आईने आपले स्त्रीधन पणाला लावले.

आईला आयुर्वेदातील बऱ्याच गोष्टी आनुभवातून माहित झाल्या. तिचे ते शिक्षण नाही. पण वाचनातून ती शिकली. तिच्या हाताला औषधाना गुणही आहे. तिचे घरगुती उपाय चमत्मकारिक वाटू शकतात. तिच्या या गुणाचा लाभ घ्यायला राेज रात्री आमच्या घरी ओपीडी भरते. विविध समस्यांवरील तेल आणि तीचा गुणकारी लेप याविषयी लोक भरभरून बोलतात. काॅलनीत बहुतेक तीचे नित्याचे पेशंट आहेत. अनेकांचे उपचार माझी माय करते. तिने हात लावला की जखम बरीच हाेणार, सांधे चांगले हाेणार, केस गळणे थांबणार. प्रशिक्षित डाॅक्टरांच्या ताेडीस ताेड ती उपचार देते. यासाठी तिला कुठून ही शक्ती मिळते काय माहित ?

आई रुपाने जेवढी देखणी आहे तेवढीच ती गुणांनीही. काेणत्याही विषयावर बाेलायला लावा. वाचन चांगले असल्यामुळे ती बोलू शकते. वाचन आणि अनुभव हेच तिचे विद्यापीठ. माझ्या आईने जे माझ्यासाठी केले ते बहुधा तिच्या तत्त्वात बसले नसेल. तिला ते मानवले नसेल. पण ती बाेलली नाही किंवा तिने जाणवू दिले नाही. काही अप्रिय घडलेही असावे. पण फक्त माझ्या करीयरसाठी ती शांत राहिली. मला आई एका वेगळ्या कारणासाठी भावते. अनुभव कसेही असले तरी ती सगळ्यांच्या मदतीला धावते. कायम काम आणि काम, मेहनतच करणे हे तिचे कार्य. कधी तरी आईने स्वातःसाठी जगावे असे मला वाटते, तसा प्रयत्न यापुढे करायचा मी नक्की प्रयत्न करेन !!!

(यामिनी कुळकर्णी, जळगाव)

सौजन्य : Dilip Tiwari’s Diamond’s Group