जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२६ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा प्रचंड प्रकोप पाहायला मिळत असून, वाढत्या उष्णतेने जळगावकर पुरते होरपळून निघाले आहेत. या असह्य उष्णतेमुळे सर्वजण पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करत आहेत. अशातच, जळगावकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २७ मे पासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व (Pre-Monsoon) सरी कोसळण्यास सुरुवात होणार असून, काही भागांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे जळगावकरांना तीव्र उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात अधिकृतपणे मान्सून दाखल होण्यास अजून काही दिवसांचा अवधी असला, तरी मान्सूनपूर्व हालचालींनी चांगलाच वेग घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी लावली आहे. आता २७ मे पासून हा पाऊस संपूर्ण जिल्हा व्यापणार असून अनेक भागांत जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
दुपारनंतर सुटणार ताशी ५० किमी वेगाने वादळी वारे
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी काही दिवस जळगाव जिल्ह्यात दुपारनंतर वातावरणात मोठे बदल पाहायला मिळतील. प्रामुख्याने सायंकाळच्या वेळी, म्हणजेच दुपारी ४ वाजेनंतर ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. या वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावेल.
दरम्यान, हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, या पावसामुळे तापमानाचा पारा जरी काही अंशाने घसरणार असला, तरी सकाळच्या वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण लक्षणीय वाढणार आहे. परिणामी, सकाळच्या सत्रात जळगावकरांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. दुपारनंतर मात्र वादळी पावसामुळे हवामानात गारवा निर्माण होईल. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज आल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजाची शेतीच्या कामांसाठी धावपळ सुरू झाली आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला आता वेग येणार असून, शेतकरी बांधवांनी आपली मान्सूनपूर्व कामे आटोपून घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे.








