जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या जात आहे. यातच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना सुरु केलीय. देशातील अधिकाधिक शेतकर्यांना सिंचनाची सुविधा मिळावी आणि पाण्याची बचत व्हावी या उद्देशाने प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana) देशभरात राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध सिंचन साधनांवर अनुदान दिले जाते. तुम्ही या योजनेचा कसा लाभ घेऊ शकतात. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

केंद्र सरकारसह, राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या दराने अनुदान देत आहेत. महाराष्ट्रातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी ८०% अनुदान मिळते. आणि २ एकर पेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ७५ % अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पाणी आणि पैसा वाचवायचा असेल तर सतत ठिबक सिंचन प्रणाली किंवा स्प्रिंकलर पद्धतीद्वारे वेळ आणि पैसा दोन्ही वाचवू शकतात. एका संशोधनानुसार, ठिबक सिंचन पद्धतीने किंवा स्प्रिंकलर पद्धतीने सिंचन केल्याने 60%-70% पर्यंत पाण्याची बचत झाल्याचे दिसून आले आहे. शेतीमध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून उत्पादनात 20%-30% वाढ नोंदवली गेली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता
शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
जर लाभार्थ्याने २०१६-१७ च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील १० वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही आणि जर लाभार्थ्याने २०१७-१८ च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागेल.
सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल.
शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात.
कागदपत्रे :
पूर्वसंमती पत्र
वीज बिल
खरेदी केलेल्या संचाचे बिल आधार कार्ड
ओळखपत्र
मोबाईल नंबर
शेतकऱ्याच्या जमिनीची कागदपत्रे
बँक खाते पासबुक
पासपोर्ट आकार फोटो
अनुदानावर सिंचन उपकरणे मिळविण्यासाठी अर्ज कोठे करावा
अनुदानावर सिंचनाची साधने मिळविण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. यासाठी शेतकऱ्याने अगोदरच शेतकरी नोंदणी करणे आवश्यक आहे. जर एखाद्या शेतकऱ्याकडे शेतकरी नोंदणी नसेल, तर तो DBT पोर्टल mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login वर जाऊन अर्ज करू शकतो. शेतकरी नोंदणीसाठी आधार क्रमांक आवश्यक असेल.
प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना Official website : Click Here












