एरंडोल येथे सत्यशोधक समाज वर्धापनदिनानिमित्त प्रबोधन शिबिर उत्साहात
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२१ । एरंडोल येथे १४८ व्या सत्यशोधक समाज वर्धापनदिनानिमित्त प्रबोधन शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना महत्व देत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
सविस्तर असे की, एरंडोल येथील मोठा माळीवाडा मधील बालाजी मढीमध्ये १४८ व्या सत्यशोधक समाज वर्धापनदिनानिमित्त प्रबोधन शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कुळवाडीभूषण छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विद्येची देवता सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून क्रांतीची मशाल पेटविण्यात देण्यात आली. एरंडोल मधील मान्यवरांच्या हस्ते खंडेरायाची तळी भरून प्रबोधन शिबिराला सुरुवात करण्यात आली. आलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांचे माळी समाज पंच मंडळाच्या वतीने शब्द सुमनांनी स्वागत करण्यात आले. प्रबोधन शिबिराचे उद्घाटनीय मनोगतात भरत शिरसाठ यांनी शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर या महापुरुषांचा विचार आत्मसात करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. प्रबोधन शिबिराचे वक्ते डॉ. सुरेश झाल्टे यांनी तात्यासाहेबांचा सत्यशोधक संस्कार अंगीकारला पाहिजे, इतिहासातले विविध उदाहरण दाखले देऊन युवकांना मंत्रमुग्ध केले. आपणच आपल्या लोकांसाठी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे, आपल्याच लोकांच्या हातून सत्यशोधक विधी झाले पाहिजे, आपली वास्तुशांती, आपला विवाह सोहळा, आपले दशक्रिया विधी आपणच केले पाहिजे असे प्रतिपादन करून खंडेरावच आपले मूळ दैवत आहे असे उदाहरणासह स्पष्ट केले. प्रबोधन शिबिराचे दुसरे वक्ते राजकिशोर तायडे यांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा जीवनपट सांगून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अखंडाचे सामूहिक वाचन केले. सत्यशोधक विचार आत्मसात करण्याची गरज आहे. आपली शिक्षण व्यवस्था निर्माण करून आपल्या महापुरुषांचे शिक्षण दिले पाहिजे, आपले सत्यशोधक विधी कर्ते महाराष्ट्रभर निर्माण केले जातील असे प्रतिपादन केले. माजी तहसिलदार अनिल माळी यांनी सत्यशोधक विवाह गावोगावी झाले पाहिजे असे प्रतिपादन केले. यानंतर विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज आहे. आम्ही धरणगाव शहरात सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक रॅली काढतो. वाढदिवस व सत्कारानिमित्त एकमेकांना ग्रंथ देऊन वाचन संस्कृती वाढविण्याचा प्रयत्न करतो. महापुरुषांचे विचार रुजवतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष देविदास भाऊ महाजन यांनी या शिबिराचे कौतुक केले व खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुले यांची सत्यशोधक चळवळ पुनरुज्जीवित झाली पाहिजे असे प्रतिपादन केले. प्रबोधन शिबिराच्या शेवटी सत्यशोधक कार्यकारणी मंडळ घोषित करण्यात आले.
यांची उपस्थिती होतीं
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोल चे माजी नगराध्यक्ष माळी समाज भूषण देविदास महाजन होते. या प्रबोधन शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते धुळे येथील सत्यशोधक डॉ. सुरेश झाल्टे, सत्यशोधक राजकिशोर तायडे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी तहसिलदार अरुण माळी, या प्रबोधन शिबिराला धरणगाव शहरातील प्रमुख अतिथी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास शंकर विसावे, महाराष्ट्र राज्याचे ओबीसी मोर्चा कार्यकारणी सदस्य, तथा माळी समाज सल्लागार पंच धरणगाव आबासाहेब राजेंद्र वाघ, प्रदेश तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष सुनील चौधरी, कैकाडी समाजाचे जिल्हाध्यक्ष बाळू जाधव, मातंग समाजाचे अध्यक्ष एकनाथ चित्ते, आदिवासी नेते विनोद चव्हाण, माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही. टी. माळी, विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, माळी समाजाचे सल्लागार पंच हेमंत माळी व पी. डी. पाटील, सत्यशोधक कार्यकर्ते व पत्रकार निलेश पवार उपस्थित होते.
यांनी परिश्रम घेतले
एरंडोल सत्यशोधक समाज प्रबोधन शिबीर यशस्वीतेसाठी शिवदास महाजन, रविंद्र महाजन, हिलाल महाजन, अनिल महाजन, मनोज महाजन, हिम्मत महाजन, दिनेश महाजन, हेमंत महाजन, कविराज पाटील यांनी परिश्रम घेतले. बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रबोधन शिबिराचे सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे राकेश पाटील सर यांनी तर आभार शिवदास महाजन यांनी मानले.