वीज चोरी भोवली : एरंडोल तालुक्यात 95 वीज ग्राहकांवर दंडात्मक कारवाई
जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२१ । तुम्ही वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करीत असाल तर खबरदार..! वीज महावितरण कंपनीने आता वीज चोरांविरोधात धडक मोहिम उघडली असून, कारवाईला सुरूवात केली आहे. एरंडोल वीज उपविभागात जवळपास तीन महिन्यांपासून वीज चोरी करणार्यांविरोधात धडक मोहिम उघडण्यात आली आहे. आतापर्यंत तालुक्यात मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करणारे 43 वीज ग्राहक आढळून आले असून, आकडे टाकून वीजचोरी करणारे 52 ग्राहक सापडले. या सर्व 95 वीज ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
वीजचोरी करणार्यांचे दणाणले धाबे
आतापर्यंत वीज चोरी करणार्यांविरोधात कारवाई होत नसल्याने त्यांचे फावले होते. वीज मीटर बायपाय करणे, आकोडे टाकणे तसेच रीमोटद्वारे मीटर बंद करणे असे प्रकार सुरू होते मात्र, वीज कंपनीने या प्रकारांना आळा बसण्यासाठी धडक मोहिम सुरू केली आहे. धडक मोहीम राबविण्यासाठी एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे, सहायक अभियंता प्रशांत महाजन, सहायक लेखापाल गोपाल चौधरी, ज्ञानेश्वर चव्हाण, रवींद्र चिंचोरे, भूषण मराठे, युनूस शेख आदी परीश्रम घेत आहेत.