फैजपूरातील धाडी नदीवरील पुलावर मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला
![dhadi nadi | Jalgaon Live News](https://jalgaonlive.news/wp-content/uploads/2024/10/dhadi-nadi-jpg.webp)
जळगाव लाईव्ह न्यूज । फैजपूर येथील धाडी नदीवरील पुलावर सावद्याकडे जाणाऱ्या दर्शनी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे या ठिकाणारून पादचारी व वाहनधारकांना जीव मुठीत धरून वापरावे लागत आहे. तरीदेखील याबाबत संबंधित यंत्रणेकडून अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेतली जात नसल्याने या पुलावरील खड्डे नेमके कोण बुजविणार असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या पुलावरील खड्डे न बुजता पुलालगत अवध्या पाच फूटांवरच दोन वेळा दोन-तीन खड्डे बुजून मीठ चोळण्याचा प्रकार केल्याच जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. काही वर्षांपासून या पुलावर मोठ्या प्रमाणावर या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
नित्याने दुचाकी या खड्ड्यांत पडून अपघात होत आहेत. म्हणून पादचारी व वाहनधारकांना जीव मुठीत धरून वापरावे लागत आहे. गेल्या तीन-चार वर्षांत या पुलावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने जनभावना तीव्र झाली आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. त्या ठिकाणी तातडीने खड्डे बुजणे अपेक्षित आहे.
मात्र, पुलालगतच अवध्या पाच फूट अंतरावर सावद्याकडे जाणाऱ्या मार्गावर दोन चार खड्डे बुजण्यात आले. त्यापुढे अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर मार्गावर असलेले खड्डे व पुलावरील खड्डे ‘जैसे थे’च आहे. मात्र, या एकाच ठिकाणी दोन-चार खड्डे बुजविण्या मागचा उद्देश काय? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.