जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२१ । मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील राजकीय वाद शमण्याची कोणतीही लक्षणे अद्याप दिसत नाही. गेल्या महिन्यातील प्रकरण ताजे असतानाच आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Pail) यांचा अवमान होईल अशा पध्दतीत फेसबुक पोस्ट करून बदनामी करणार्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना शाखा प्रमुख गणेश अशोक टोंगे (रा.मुक्ताईनगर) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, त्यांना काल रात्री सव्वाआठच्या सुमारास तालुक्यातील तालखेडा येथील दीपक गजानन वाघ या शिवसेनेच्या कार्यकर्त्याने फेसबुकवर आमदार चंद्रकांत पाटील यांची बदनामी करणारी पोस्ट टाकण्यात आल्याची माहिती दिली. याबाबत माहिती घेतली असता, अशोक गावंडे नावाच्या फेसबुक प्रोफाईलवर हा प्रकार घडल्याचे दिसून आले.
मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा आणि कोहाळा येथील भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. या पक्ष प्रवेशा प्रसंगीच्या फोटोवर अशोक गावंडे याने डुकरे, ससे आदींसह अन्य प्राण्यांचे फोटो टाकून ते आपल्या प्रोफाईलवरून शेअर केल्याचे दिसून आले. यासोबत आमदार पाटील यांच्या फोटोवरही हाच प्रकार करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
सदर पोस्टमुळे आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेची बदनामी झाल्याच्या कारणावरून गणेश अशोक टोंगे यांनी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार अशोक गावंडे रा.मुक्ताईनगर याच्या विरोधात रात्री उशीरा भादंवि कलम ५०० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हे देखील वाचा :
- प्रवाशांसाठी खुशखबर! जळगाव, भुसावळमार्गे धावणार ‘या’ नवीन रेल्वे गाड्या
- जीएसटी परिषदेत घेतले अनेक मोठे निर्णय: कोणत्या वस्तू स्वस्त, कोणत्या महाग? जाणून घ्या..
- जळगावातील तापमानाचा पारा वाढला, खान्देशात पुढचे तीन दिवस असं राहणार तापमान?
- जळगावात सोन्यासह चांदीचा भाव वाढला; आता १० ग्रॅमचा भाव काय?
- इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (IGI) चा IPO बाजारात दाखल; किती रुपयांनी उघडला?