⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

शेतकऱ्यांसाठी पोस्टाची भन्नाट योजना

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२ । भविष्यातील तरतूद म्हणून गुंतवणूक करण्याची इच्छा तर आहे, पण नेमकी कुठे गुंतवणूक करावी, असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण, सध्या फसवणूकीचे प्रकार इतके वाढलेत, की चुकीच्या ठिकाणी घामाचे दाम टाकले नि ते बुडाले, तर काय..? अशी भीती अनेकांना वाटते.

मात्र, पोस्ट ऑफिसने विविध योजना सुरु केल्या असून, त्यात जोखमीची कोणतीही भीती नाही. पोस्टाने शेतकऱ्यांसाठी अशीच एक भन्नाट योजना सुरु केलीय. तेही अगदी कमी गुंतवणुकीत चांगला परतावा देणारी ही योजना आहे. या योजनेत पैसे गुंतवल्यास अवघ्या काही काळातच ते दुपटीने तुम्हाला मिळणार आहेत. पोस्टाच्या या योजनेचे नाव आहे, ‘किसान विकास पत्र योजना’.

पोस्टाने खास शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरु केली आहे. त्याचा शेतकऱ्यांना कसा लाभ होतो, त्यासाठी गुंतवणूक कशी व कुठे करायची व योजनेबाबतची सगळी माहिती जाणून घेऊयात.

शेतकरी विकास पत्र योजनेबाबत :

केंद्र सरकारने सुरु केलेल्या सर्वात लोकप्रिय बचत योजनांमध्ये या योजनेचा समावेश होतो. कोणत्याही जोखमीशिवाय हमखास चांगला परतावा देणारी ही योजना असून, नागरिकांना बचतीसाठी, निरोगी गुंतवणूकीसाठी ही योजना मदत करते.

शेतकरी विकास पत्र पोस्ट ऑफिस योजना ही 113 महिन्यांसाठी चालते. त्यानंतर गुंतवणुकदारांना निश्चित परतावा देते. भारतीय टपाल कार्यालये किंवा निवडक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कोणत्याही शाखेत या योजनेचा लाभ घेता येतो.

योजनेचे प्रकार

● सिंगल होल्डर : या प्रकारामध्ये प्रौढ व्यक्तीला केव्हीपी प्रमाणपत्र दिले जाते.
● संयुक्त ‘ए’ प्रकार : दोन खातेदारांना ‘केव्हीपी’ प्रमाणपत्रे दिले जातात. त्यात दोन्ही खातेदारांना मुदतपूर्तीच्या वेळी पे-आउट मिळते. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, केवळ एकालाच ते मिळण्याचा हक्क असतो.
● संयुक्त ‘बी’ प्रकार : दोन प्रौढांच्या नावाने ‘केव्हीपी’ प्रमाणपत्र जारी केली जातात. जॉईंट खात्यांप्रमाणे मॅच्युरिटीवर, दोन पैकी एकाला पे-आउट मिळेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.

शेतकरी विकास पत्र योजनेचे फायदे :

● योजनेत पैसे गुंतवणाऱ्यास बाजारात अस्थिरता असली, तरी चांगला, खात्रीशीर परतावा मिळतो.
● किसान विकास पत्र योजनेची कालमर्यादा 113 महिन्यांची आहे. हा कालावधी पूर्ण केल्यानंतर गुंतवणुकदाराला निधी दिला जातो..
● या योजनेत किमान 1,000 रुपये किंवा जास्तीत जास्त हवी तितकी गुंतवणूक करता येते.
● मुदतपूर्तीनंतर काढलेल्या रकमेवरील कर URS किंवा TDSच्या कपातीतून सूट मिळते.
● गुंतवणुकदाराला त्याच्या गुंतवणूकीवर कमी व्याज दराने कर्ज मिळू शकते.
● आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आदी.

इथे करा अर्ज :
किसान विकास पत्र योजनेसाठी पात्र असाल नि त्यात अर्ज करायचा असेल, तर पोस्टाच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर या योजनेचा लाभ घेऊ शकता.

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.