पोलीस भरती : शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी कार्यक्रम जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता शारिरीक चाचणी व कागदपत्र पडताळणीला दि.९ नोव्हेंबर रोजी सुरुवात करण्यात येणार आहे. तीन दिवसात शारिरीक चाचणी, मैदानी चाचणी व कागदपत्र पडताळणी पूर्ण करण्यात येणार असल्याने उमेदवारांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पोलीस कवायत मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.
जळगाव जिल्हा पोलीस दलातील आस्थापनेवरील १२८ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार २१ हजार ६९० उमेदवारांसाठी दि.९ ऑक्टोबर रोजी जळगाव आणि भुसावळ येथे लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या परीक्षेचा निकाल जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेला असून या परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरिक चाचणी व कागदपत्र पडताळणीसाठी १:१० प्रमाणे गुणवत्ता यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांसाठी शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीचा कार्यक्रम पोलीस दलाकडून जाहीर करण्यात आला आहे. दि.९ व १० नोव्हेंबर रोजी पुरुष उमेदवार व दि.११ नोव्हेंबर रोजी महिला व माजी सैनिक पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी, मैदानी चाचणी व कागदपत्र पडताळणी करण्यात येणार आहे.
पात्र ठरलेल्या उमेदवारांनी वेळापत्रकाप्रमाणे नेमूण दिलेल्या दिनांकास सकाळी ६ वाजता पोलीस कवायत मैदान येथे उपस्थित राहावे, दिलेल्या कालावधीत उपस्थित नसलेल्या उमेदवारास अन्य दिवशी उपस्थित राहण्याची संधी दिली जाणार नाही, पोलीस दलाकडून जाहीर करण्यात आले आहे. शारीरिक चाचणी कार्यक्रमाविषयी काही अडचणी असल्यास ०२५७-२२३३५६९ या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच पोलीस भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही व्यक्तीने उमेदवाराकडून पैशाची मागणी केल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.