जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, गेल्या २४ तासांत धरणगाव आणि भुसावळ पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन गावठी पिस्तूल (मॅग्झिनसह) आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. याप्रकरणी एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

धरणगाव शिवारातील गिरणा नदीच्या पात्रात एक इसम संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून आनंदा बळीराम सपकाळे (वय ३९, रा. प्लॉट नं. ४३, सिद्धार्थ नगर, आव्हाणे, ता. जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २५,००० रुपये किमतीचे एक लोखंडी सिल्व्हर रंगाचे गावठी बनावटीचे पिस्तूल (मॅग्झिनसह) आढळून आले. शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी ते जप्त केले. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर व पथकाने ही कारवाई केली असून पो. कॉ. ज्ञानेश्वर नथ्थू सपकाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई भुसावळ शहर बाजारपेठ पोलिसांनी १४ मे २०२६ च्या मध्यरात्री ००:१० वाजेच्या सुमारास केली. शिरपूर-कन्हाळा रोडवरील घोडे पीर बाबा दर्ग्याच्या मागील मोकळ्या जागेत काही संशयास्पद हालचाली होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्रीच तिथे धाड टाकली.
या कारवाईत पोलिसांनी असद अली शेख खालीद अली (वय १९, रा. आझाद नगर, बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) व मोहम्मद राजीक मोहम्मद आरिफ (रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ४०,००० रुपये किमतीचे एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल (काळ्या रंगाची प्लास्टिक ग्रीप असलेले) आणि १,००० रुपये किमतीचा एक जिवंत राऊंड (काडतूस) असा एकूण ४१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल टी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पोलीस कॉन्स्टेबल जावेद हकीम शाह यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे करत आहेत.
पोलिसांचा कडक इशारा
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा कडक इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.









