चोपड्यात गांजा विक्री करणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा-शिरपूर रोडवरील अकुलखेडा गावाजवळ, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक महत्त्वपूर्ण कारवाई करत गांजा विक्री प्रकरणी दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत आरोपींकडून तब्बल २.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्यामध्ये ४ किलो ५०० ग्रॅम गांजा समाविष्ट होता.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि चोपडा शहर पोलिसांनी संयुक्तपणे केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शिरपूर येथून एक इसम मोटारसायकलवर गांजा विक्रीसाठी अकुलखेडा गावाजवळ जाणार होता. या माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचला आणि विजय देवराम मोरे (वय २८, रा. भोरखेडा, ता. शिरपूर, जि. धुळे) आणि अविनाश भिका पाटील (वय २६, रा. वाघळुद, ता. धरणगाव, जि. जळगाव) यांना अटक केली.
आरोपींकडून जप्त केलेल्या मुद्देमालात दोन मोटारसायकली, दोन मोबाईल आणि इतर सामग्री समाविष्ट होती. या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ३१ हजार रुपये आहे. चोपडा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
या कारवाईत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात आले. चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सपोनि एकनाथ भिसे, पोउनि गणेश वाघमारे, पोउनि अनिल जाधव, पोह विलेश सोनवणे, दिपक माळी, रविंद्र पाटील, हेमंत पाटील, प्रदीप चवरे, जितेंद्र चव्हाण, गोकुळ सोनवणे, योगेश बोडखे आणि विनोद पाटील यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.