जळगावच्या जैन हिल्स येथे पोळा सण उत्साहात साजरा

ऑगस्ट 22, 2025 5:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२५ । बैल पोळा सणाच्या निमित्ताने जळगावच्या जैन समूहाच्या वतीने बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. आदिवासी लोककला, ढोल ताशांच्या गजरात, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह, बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात आला. शेतात सालदारांचा सन्मान करण्यात आला. तर बैल पूजन करत बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरून बैलपोळ्याचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अशोक जैन यांच्यासह शहरातील मान्यवरांसह अनुभूती स्कूल व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला.

jain bail pola

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी २९ वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्याची पद्धत सुरू केली होती. जैन हिल्स येथील ध्यानमंदीर येथे कृषी संशोधन प्रात्याक्षिक केंद्राच्या शेती विभागाच्या विविध ठिकाणाच्या सालदार मंडळींनी बैलांना एकत्र करून त्यांना पोळ्यासाठी तयार केले. तेथूनच सवाद्य मिरवणूक निघाली. कंपनीचे संस्थापक श्रद्धेय मोठेभाऊ भवरलालजी जैन यांचे स्मृतिस्थळ ‘श्रद्धा ज्योत’ येथे भाऊंच्या स्मृतिंना अभिवादन केले गेले. मारुतीच्या मंदिराचे दर्शन घेऊन सरस्वती पॉईंट, गुरुकुल पार्किंग मार्गे निघालेली सवाद्य मिरवणूक जैन हिल्स हेलीपॅडच्या मैदानात पोहोचली. यावेळी अशोक जैन यांच्या हस्ते धवल ध्वज फडकावून बैल पोळाची सुरवात झाली.

अविनाश गोपाळ, हंसराज जाधव यांना पोळा फोडण्याचा मान

हा पोळा अजून द्विगुणीत व्हावा यासाठी कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या संकल्पनेने यावर्षी पोळा फोडण्याच्या रोख पारितोषिकात वाढ करण्यात आली होती. त्यानुसार यावर्षी २० हजार रुपयांचे रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते वितरीत झाले. त्यात जैन वाडा येथील सालदार हंसराज थावरस जाधव, अविनाश गोपाळ यांना पहिला मान मिळाला. हंसराजने यावर्षी सलग चौथ्यांदा पोळा फोडण्याचा मान मिळविला आहे. त्यांना प्रत्येकी (रोख ५ हजार रुपये) तर जैन सोसायटीचे दिलीप पावरा, साजन पावरा यांना दुसरा मान मिळाला (प्रत्येकी २ हजार रुपये) तर उर्वरित सहा जणांना तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळाला. त्यात गोविंद पावरा, भगवान सावळे, वाल्मिक शिंदे, किशोर शिंदे, रामसिंग पवार यांना गौरविण्यात आले.

आदिवासी नवाय गरभा नृत्याने आली रंगत…

यावल तालुक्यातील निंबादेवी धरणाजवळ असलेल्या रोशनबर्डी येथील वालू सोनासिंग बारेला यांच्या कलापथकाने पारंपरिक आदिवासी नृत्य आणि चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केले. विशेष म्हणजे या कलापथकाच्या मालकीची २० एकर जमीन असून त्यांनी गेल्यावर्षी जैन इरिगेशनने विकसीत केलेल्या जैन स्वीट ऑरेंजची लागवड केली आहे. या पथकाने आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी कुठलेही मानधन न घेता पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकी एक फळझाड द्यावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते या पथकाच्या सदस्यांनी रोपे स्वीकारली.

ढोलताशांची विश्वगर्जना…

जळगावातील विश्वगर्जना युवा सदस्यांच्या ढोल पथकातील १०० वादकांनी तालबद्ध वादन करुन उपस्थीतांची मने जिंकली. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले. अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा जल्लोष केला. शिरसोली येथील बॅन्ड बथकाच्या वाद्यावर अॅग्री टास्क फोर्स, सालदार मंडळी आणि सहकाऱ्यांनीही संबळावर नृत्याविष्कार सादर केला. विशेष महत्त्वाचे म्हणजे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अतुल जैन यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी वाद्याच्या तालावर ठेका धरून आपला आनंद व्यक्त केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now