जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा.जितेंद्र नाईक आणि संशोधक विद्यार्थी सागर परदेशी यांनी डोळ्यांच्या संसर्गावर उपचारासाठी नवीन बुरशीविरोधी औषध वितरण प्रणाली विकसीत केली आहे.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाकडून विज्ञानातील उत्कृष्टतेसाठी सक्षमीकरण आणि समानसंधी अंतर्गत प्रा.नाईक यांना संशोधनाच्या या प्रकल्पासाठी निधी प्राप्त झाला आहे. म्युकोअॅडेसिव्ह पॉलिमर बेस्ड ऑप्थॅल्मिक ड्रग डिलेव्हरी सिस्टीम असे या संशोधन प्रकल्पाचे नाव आहे.
नेत्रोपचारासाठी औषध प्रणालीचे संशोधन या मध्ये करण्यात आले असून नवीन बुरशीविरोधी औषध वितरण प्रणाली यातून त्यांनी समोर आणली आहे. या प्रणालीमुळे औषधाची परिणामकारकता वाढते तसेच बुरशीजन्य डोळ्यांच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे डोस कमी होतात. व्होरिकोनाझोल नॅनोपार्टिकल्स लोडेड कार्बोक्झिमेथिल चिटोसन-पॉक्सॅमर आधारित जेल प्रणाली विकसित करत ती खोलीच्या तपमानावर द्रवरुपात राहते आणि डोळ्यात टाकल्यानंतर जेलमध्ये रुपांतरीत होते त्यामुळे त्यातून कमी डोस मध्ये कॅन्डिडा द्विरूपी बुरशी अधिक कार्यक्षमतेने मारण्यास सक्षम होते आणि म्युकोअॅडेसिव्ह जेलिंग प्रणालीच्यामदतीने औषध अतिसुक्ष्म (नॅनोसाईज) केले जाते.
हे नॅनोफॉर्म्युलेशन डोळ्यासाठी विषारी अथवा त्रासदायक नाही ते केवळ बुरशीला लक्ष्य करून आपले उद्दिष्ट साध्य करते. ते बुरशीविरोधी प्रतिरोधक स्टेनवरही वापरता येऊ शकते का ? याचा अभ्यास करण्याची योजना या संशोधकांची आहे. या संशोधनाचे निकर्ष ड्रग डिलेव्हरी अॅण्ड ट्रान्सलेशनल रिसर्च, स्प्रिंगर या नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.