जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२४ । देशभरात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून यावरून विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतला. आता महिला अत्याचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा देण्यासाठी आमचं सरकार कायदा कडक करत आहेत. अत्याचार करणारी मानसिकता आपल्याला दूर करायची आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
आज जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘लखपती दीदीं’चा मेळावा पार पडला. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील स्त्रियांचा गौरव केला. तसेच महिला अत्याचारांच्या वाढत्या गुन्ह्यांबद्दलही भाष्य केले. महिलांवरील होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका, त्याला कोणत्याही प्रकारे मदत करणारे वाचले नाही पाहिजे.
रुग्णालय, शाळा, पोलीस व्यवस्था, कोणत्याही ठिकाणी निष्काळजीपणा होत असेल तर हिशोब करा. वरपर्यंत मेसेज जाऊ द्या. हे पाप अक्षम्य आहे. सरकार येईल जाईल,. पण जीवनाची रक्षा, नारीची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. सर्व राज्य सरकारांना सांगतो, आणि राजकीय पक्षांना सांगतो”, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
“अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा देणार”
“महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा देण्यासाठी आमचं सरकार कायदा कडक करत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने महिला आल्या आहेत. आधी तक्रार येत होती, वेळेत एफआयआर होत नाही. सुनावणी होत नाही. खटला उशीरा सुरू होतो. निर्णय उशिरा येतो. या अडचणी भारतीय न्याय संहितेतून दूर केला आहे. एक चॅप्टर महिला आणि बाल अत्याचाराचा आहे. पीडित महिलांना पोलीस ठाण्यात जायचं नसेल तर ई एफआयआर करू शकते. ई एफआयआरमध्ये कोणी छेडछाड करणार नाही याचीही व्यवस्था केली आहे. त्यामुळे चौकशी चांगली होईल आणि दोषींवर शिक्षा करण्यास मदत होईल”, असे नरेंद्र मोदींनी म्हटले.