जळगावसह प्रमुख रेल्वेस्थानकांवर ‘या’ तारखेपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२४ । जळगाव दिवाळी तसेच छटपूजा आदी सणांच्या गर्दीमुळे प्रवाशांची प्रत्येक रेल्वे स्टेशनवर गर्दी वाढत आहे. यातून काही ठिकाणी बेंगराचेंगरीसारख्या गंभीर घटना तर कुठे चोरीच्या घटनाही घडत आहेत. फलाटांवरील गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वे भुसावळ प्रशासनाकडून जळगावसह मनमाड आणि नाशिक रोड आदी प्रमुख स्थानकांवर फलाट (प्लॅटफॉर्म तिकीट) तिकीट विक्री सोमवार, २८ पासून तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे
त्यामुळे आता ८ नोव्हेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट दिले जाणार नाही. दिवाळी व छठपूजेनिमित्ताने मोठ्या रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. या गर्दीची संधी साधून समाजकंटक, चोर-भामटे सक्रिय होतात. त्यामुळे प्रवाशांना मोठे नुकसान होते. एकीकडे प्रवाशांच्या गर्दीमुळे रेल्वेस्थानक परिसरात पाय ठेवायला जागा नसताना आपल्या नातेवाइकांना सोडण्यासाठी किंवा त्यांना रेल्वेस्थानकावर घ्यायला येण्यासाठी अनेकजण येतात. परिणामी गर्दीत आणखीच भर पडते. तसे होऊ नये म्हणून गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वेकडून विविध उपाययोजना करण्याचे ठरले आहे. रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे.
वृद्धांना, रुग्णांना मिळाली सूट
गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ही व्यवस्था केली आहे; मात्र त्यातून ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना सूट देण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी येणाऱ्यांना हे निर्बंध लागू होणार नसल्याचे रेल्वेने कळवले आहे. दरम्यान, काही कारण नसताना रेल्वे स्थानकावर येणाऱ्यांवर रेल्वेची नजर असणार असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.