⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

उदरनिर्वाहासाठी महिला चालवतायं पिंक रिक्षा पण पुरुषांकडून होतोय हा त्रास

जळगाव लाईव्ह न्यूज | ६ एप्रिल २०२३ | महिला आता कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाही. यामुळे आता सर्व क्षेत्रात महिलांची भागादारी वाढत आहे. पुरुषांची मक्तेदारी असणार्‍या रिक्षा व्यवसायामध्येही महिलांनी पदार्पण केले आहे. शहरातील रस्त्यांवर धावणार्‍या पिंक अर्थात गुलाबी रिक्षा महिलाच चालवित आहेत. जळगाव शहरात गरीब, होतकरू व बेरोजगार महिला व तरुणी या रिक्षांवर उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र या महिला रिक्षा चालकांना पुरुषी मानसिकतेचा त्रास सहन करावा लागत आहे.

पुरुष रिक्षा चालकांकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून पिंक रिक्षा चालकांनी मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची भेट घेवून निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की शहरात गुलाबी रिक्षाचालक महिलांना पुरुष रिक्षाचालक प्रवासी घेऊ देत नाहीत. शहरात थांबे न दिल्याने त्यांना रिक्षा थांबविणेही कठीण होत आहे. जळगाव शहरात गरीब, होतकरू व बेरोजगार महिला व तरुणी या रिक्षांवर उदरनिर्वाह करीत असून, त्यांना पुरुष रिक्षाचालक ठिकठिकाणी प्रवासी घेऊ देत नाही. अरेरावी, अश्लिल संभाषण करून या महिलांना अपमानास्पद वागणूक देतात.

महिला रिक्षाचालक व मालकांनी जळगाव जनता बँकेकडून कर्ज काढून रिक्षा घेतल्या असून, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व मुलींच्या लग्नाची सर्वत्र जबाबदारी या महिलांवर आहे. त्यांना रिक्षाव्यवसाय करण्यास जाणून बुजून काही पुरुष रिक्षाचालक मानसिक त्रास देत आहेत, तसेच वाहतूक विभागाकडूनही त्यांना त्रास दिला जातो. म्हणून महिला रिक्षाचालकांना व्यवसायचे ठिकाण असलेले रेल्वेस्थानक, नवीन बसस्थानक व टॉवर चौक येथे थांबा मिळावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

लहुजी बिग्रेडच्या अध्यक्षा आशा अंभोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी चालक माधुरी भालेराव, माधुरी निळे, पोर्णिमा कोळी, पूनम गजरे, रंजना पवार, मालू सोनवणे, मनीषा सुरळकर, सरला पानपाटील, संगीता बारी, लिना सोनवणे उपस्थित होत्या.