जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२६ । मागील काही दिवसापासून ज्याची भीती होती अखेर तेच घडले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ आणि रुपयाची होत असलेली घसरण यामुळे केंद्र सरकारने आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची मोठी वाढ जाहीर केली आहे.

मध्य पूर्वेतील सध्याच्या संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार होत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठा साखळी विस्कळीत झाली. यामुळे सुरुवातीला देशात गॅसच्या दरात वाढ झाली. आता, केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ शुक्रवार, १५ मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून देशभरात लागू झाली.

गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ होणार नाही, असे संकेत सरकारने दिले होते. मात्र, जागतिक परिस्थिती हाताबाहेर गेल्याने ही दरवाढ अनिवार्य ठरली आहे. नव्या दरवाढीनुसार, मुंबईत पेट्रोल १०६.५० रुपये तर डिझेल ९३ रुपयांवर पोहोचले आहे. तर जळगाव मध्ये एक लिटर पेट्रोलचा दर १०८ रुपयांवर, तर डिझेलचा दर ९४.४७ रुपयावर पोहोचले आहे. आज सकाळपासूनच हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.
दरम्यान, एप्रिल २०२२ नंतर तेल कंपन्यांनी केलेली ही पहिलीच दरवाढ आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल चार वर्षांपूर्वी झाला होता. तेलाच्या या दरवाढीचा परिणाम भविष्यात किरकोळ महागाई दरावर जाणवेल.








