⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२२ । प्रसिद्ध संगीतकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे आज (१० मे) वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. संतूर वादकाला त्यांनी जगात वेगळी ओळख मिळवून दिली होती. पंडित शिवकुमार शर्मा यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या हिट गाण्यांना संगीत दिले.

पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1938 रोजी जम्मू काश्मीरमधील डोगरा येथे झाला. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या वडिलांचे नाव उमा दत्त शर्मा होतं. उमा दत्त शर्मा उत्तम वादक आणि गायकही होते. पंडित शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या पाचव्या वर्षी तबला आणि संगीत शिकवण्यास सुरुवात केली. 1999 मध्ये एका मुलाखतीदरम्यान त्यांनी ही गोष्ट सांगितली होती. त्यांच्या वडिलांनी संतूर वाद्यावर खूप संशोधन केले आणि संतूरवर भारतीय शास्त्रीय संगीत वाजवणारे शिवकुमार हे पहिले भारतीय व्हावेत असा संकल्प केला. शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या १३ व्या वर्षी संतूर वाजवण्यास सुरुवात केली आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

अनेक चित्रपटांमध्ये दिलेली प्रसिद्ध गाणी
पं. शिवकुमार शर्मा यांनी झाकीर हुसेन आणि हरिप्रसाद चौरसिया यांसारख्या अनेक संगीतकारांसोबत जवळून काम केले आहे. डर, सिलसिला, लम्हे इत्यादी अनेक हिंदी चित्रपटांसाठीही त्यांनी गाणी रचली. कॉल ऑफ द व्हॅली, संप्रदाय, एलिमेंट्स: जल, संगीत की पर्वत, मेघ मल्हार इत्यादी त्यांचे काही प्रसिद्ध अल्बम आहेत.

संगीतातील योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले
संगीत क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल, पंडित शिवकुमार शर्मा यांना पद्मश्री, पद्मविभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, जम्मू विद्यापीठाची मानद डॉक्टरेट, उस्ताद हाफिज अली खान पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार इत्यादी अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.