⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राने जागतिक युवा कौशल्य दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दिनांक 15 जुलै 2022 सकाळी 11.00 वाजता मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, यांच्या प्रमुख उपस्थित पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन शासकीय औदयोगीक प्रशिक्षण संस्था (आय.टी. आय) मेस हॉल, नॅशनल हायवे नं.6 जळगांव येथे करण्यात आले होते.

या मेळाव्यासाठी एकूण सात औदयोगिक / खाजगी आस्थापनांनी 10 वी 12 वी पास आय टि आय, डिप्लोमा धारक पदवीधर आणि इतर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या होत्या. मेळाव्याचा एकूण 123 उमेदवारांनी लाभ घेतला व विविध आस्थापनांच्या स्टॉलवर भेटी देऊन मुलाखती दिल्या, या पैकी एकूण 82 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आलेली असून अंतिम निवडीची कार्यवाही उदयोजकांचे स्तरावर सुरु आहे.

मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मा. जिल्हाधिकारी महोदयांनी मनोगत व्यक्त करुन उपस्थित उमेदवारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यां त्याचप्रमाणे विभागाच्या रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत (ईपीपी) आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यांत आल्या आहेत. अशा उदयोजकांना मा. जिल्हाधिकारी महोदयांचे शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचे सामूहिक प्रयत्नातून आयोजित केलेल्या मेळाव्याचा समारोप करण्यात आला, असे सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता, वि जा मुकणे, जळगाव यांनी एक प्रसिध्दी पत्रकान्वये कळविलेले आहे.