दुभाजकावरील संतांचे पेंटिंग हटविले, समाजसेवक प्रा.धीरजपाटलांनी घेतला होता आक्षेप

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२२ । भुसावळ शहरातील मुख्य रस्त्यावर दुभाजक टाकण्याचे काम बऱ्यापैकी झाले आहे.  दुभाजकाच्या सुशोभिकरणाचे काम गतीने सुरु आहे. पण जामनेर रोडवरील अहिल्यादेवी विद्यालयासमोर या दुभाजकावर संतांचे पेंटिंग्ज काढले जात असताना समाजसेवक प्रा. धीरज पाटील यांनी त्यावर आक्षेप घेत संतांच्या पेंटिंगची विटंबना होऊ नये म्हणून संतांचे पेंटिंग करून नये अशी कठोर भूमिका घेतली. शेवटी दुभाजकावरील संतांचे पेंटिंग्ज हटविण्यात आले.

शहरातील लोखंडी पुलाच्या बोगद्यांचे सुशोभीकरण करण्यात येऊन ऍक्वारियम व स्पेस ची चित्रे बोगद्याच्या भिंतीवर काढण्यात आली. सुशोभीकरणाची हीच पुनरावृत्ती दुभाजकांसाठी वापरण्यात आली. यावल रोड, जळगाव रोड येथे समाजात चांगला संदेश जाईल व प्रबोधन होईल अशी चित्रे काढण्यात आली. जामनेर रोडवरील दुभाजकाचे सुशोभीकरण सुरू झाले आहे.

अहिल्यादेवी कन्या विद्यालयाजवळ दुभाजकांवर संत ज्ञानेश्वर, संत सोपान, संत निवृत्ती यांची प्रतिकात्मक चित्रे काढलेली होती. प्रा.धीरज पाटील यांना काही नागरिकांनी याबद्दल माहिती दिली व सोशल मीडियावरसुद्धा या बद्दल नाराजी व्यक्त होत होती. प्रा.पाटील यांनी तातडीने तेथे जाऊन संतांची चित्रे दुभाजकावर काढू नका, त्यांची विटंबना होऊ शकते आणि वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. अप्रिय प्रसंग टाळण्यासाठी ही चित्रे काढून टाकावी अशी सूचना त्यांनी केली. चित्र काढणाऱ्या कलाकारांनी लागलीच ती चित्रे मिटविले .

दुभाजकावर गुटखा, पान तंबाखू व तत्सम पदार्थ खाऊन थुंकण्याचे प्रकार घडत असतात. अनेकदा दुभाजकावर पाय ठेवले जातात. वातावरणाने चित्रे काळी पडतात. समाजात संतांचे कार्य मोठे आणि प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या चित्राची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारकरी संप्रदायाची भावना दुखू नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे, प्रा.धीरज पाटील यांनी या प्रसंगी सांगितले.