जळगाव लाईव्ह न्यूज । चारित्र्याच्या संशयावरून पतीने चाकूने वार करत पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे घडली. या घटनेनंतर पतीनेही स्वतः गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी पाचोरा पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी आत्महत्येपासून परावृत्त करीत त्याला लागलीच ताब्यात घेतले.

प्रियंका खुशाल भदाणे (२८) असे या मृत विवाहितेचे तर खुशाल भदाणे (३२) असे पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी, ता. चाळीसगाव येथील माहेर असलेल्या प्रियंकाचा आणि खुशालचा यांचा विवाह २०१६ मध्ये निंभोरा, ता. सोयगाव येथे झाला होता. सन २०२० पासून ते पाचोरा येथील गुरुदत्तनगर भागात राहायला आले होते. त्यांना दोन मुले आहेत.

खुशाल हा सेंट्रिंग काम करतो. खुशाल हा पत्नी प्रियंकावर संशय घेत होता. यावरून रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात खुशालने घरातील चाकूने प्रियंकाचा जागीच कोसळली. पत्नीचा खून केल्यानंतर खुशाल याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
या घटनेप्रकरणी मयत प्रियंका हिच्या मावशीच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात पती खुशाल भदाणे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय निकुंभ हे करीत आहेत.











