⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष मोहीमेचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत २७ व २८ नोव्हेंबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.

या कार्यक्रमांतर्गत १६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १५ हजारांहून अधिक दावे व हरकती प्राप्त झाल्या आहेत. याच धर्तीवर आता महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात प्रभागनिहाय मतदार यादीचे वाचन २६ नोव्हेंबरपर्यंत करण्यात येईल.

प्रभाग सभेत सध्या अस्तित्वातील मतदार यादी प्रभागातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्यांचे वय १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्ष पूर्ण होत आहे तसेच ज्यांची नावे अद्याप मतदार यादीत नोंदविलेली नाहीत त्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात येईल. तसेच प्रभागातील सर्व नागरिकांना मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद तपासून दावे व हरकती सादर करता येतील. तसेच प्रभागातील मृत, स्थलांतरीत, दुबार, लग्न होवून बाहेरगावी गेलेल्या महिला मतदारांची नावे वगळणीबाबत कार्यवाही करण्यात येईल. दिव्यांग तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींची नावे मतदार यादीमध्ये चिन्हांकित करण्यात येणार आहेत. शहरी भागातील मतदारांनी प्रभागनिहाय यादी वाचनात सहभागी व्हावे, असेही आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी राऊत यांनी केले आहे.