जळगाव लाईव्ह न्यूज । अजिंठा फिल्म सोसायटी देवगिरी चित्र साधनाद्वारा आयोजित चौथा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल उद्या म्हणजेच ८ व ९ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे होत आहे. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. चित्रपट विषयक प्रदर्शनी, शॉर्ट फिल्म स्क्रीनिंग, मास्टर क्लास, चर्चासत्र, ओपन फोरम, दुरिंग टॉकीज तसेच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांसह उद्घाटन व समापन सोहळा अशा विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव रंगणार असल्याची माहिती आयोजन समितीचे प्रमुख डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जयंत शेवतेकर, उपाध्यक्ष अनिल भोळे, सचिव विनीत जोशी, कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे, किरण सोहळे आदींची उपस्थिती होती.

यंदा खान्देश व मराठवाडा क्षेत्रासह संपूर्ण राज्यातून महोत्सवासाठी १००हून अधिक शॉर्टफिल्म सहभागी झाल्या आहेत. तज्ज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण करून यातील निवडक ७२ शॉर्ट फिल्मचे अधिकृत प्रदर्शन या दोन दिवसीय महोत्सवात करण्यात येणार आहे. सभागृहाचा संपूर्ण परिसराला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रनगरी, स्क्रिनिंग सभागृहांना पद्मविभूषण झाकीर हुसेन व अभिनेता अतुल परचुरे यांचे नाव देण्यात आले आहे. महोत्सवाची ओपनिंग फिल्म ९ रोजी सकाळी ९ वाजता उस्ताद झाकीर हुसेन सभागृहात प्रदर्शित करण्यात येईल, यानंतर महोत्सवात सहभागी निवडक तब्बल ७२ चित्रपटांचे प्रदर्शन दोन दिवसांत दोन्ही कक्षात करण्यात येणार आहे.
अभिनयातील संधीवर तज्ज्ञ करणार मार्गदर्शन:
शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये ८ रोजी दुपार सत्रात १२ ते १ या वेळात चित्रपट निर्मिती करणाऱ्यांसाठी माहितीपट निर्मिती प्रक्रिया या विषयावर दिग्दर्शक अरुण शेखर यांचा मास्टर क्लास होईल. ‘अभिनय क्षेत्रातील संधी’ या विषयावर अभिनेता गिरीश कुलकर्णी यांचा मास्टर क्लास दुपारी ३ वाजता होईल. स्व. राज कपूर मुख्य सभागृहात सायंकाळी ५ वाजता रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमासह उद्घाटन सोहळा होईल. शोमॅन स्व. राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम यावेळी सादर करण्यात येईल. अभिनेता गिरीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक नितिन भास्कर यांना यंदाचा देवगिरी चित्रगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ‘श्री ४२०’ हा चित्रपट एम्फी थिएटर, भाऊंचे उद्यान येथे प्रदर्शित करण्यात येईल.
दोन्ही सभागृहात फिल्म स्क्रिनिंग
९ रोजी सकाळी ९ वाजेपासून दोन्ही सभागृहात फिल्म स्क्रिनिंग होईल. सकाळी ११ वाजता चित्रपट रसग्रहण या विषयावर दिग्दर्शक मिलिंद लेले (पुणे) यांचा मास्टर क्लास होईल. एम. जी. एम. विद्यापीठ फिल्म मेकिंग विभागाचे प्रमुख प्रा. शिवदर्शन कदम ‘ग्रामीण भागातील युवकांना चित्रपटातील संधी व प्रशिक्षण’ या विषयांवर युवा फिल्म मेकर्ससाठी मास्टर क्लास होईल. दुपार सत्रात होणाऱ्या ओपन फोरम सत्रात ‘योफिमा’ शिष्यवृत्ती विजेते युवा चित्रकर्मीसह दिग्दर्शक भाऊराव कराडे युवकांना मार्गदर्शन करतील.