जळगावसाठी आजचा अत्यंत धोकादायक दिवस; जिल्ह्यासाठी पावसाचा अन् गारपिटीचा ऑरेंज अलर्ट..

मार्च 19, 2026 10:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२६ । महाराष्ट्रात हवामान खात्यानं अवकाळी पावसासह गारपीटचा इशारा दिला होता. तो तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे. मागच्या दोन दिवसापासून राज्यामधील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. दरम्यान, आजचा दिवस देखील जिल्ह्यासाठी अत्यंत धोकादायक असणार आहे. कारण आज देखील जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.

garpithrain

जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात उष्णतेचा तडाखा वाढला होता. मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात तापमानाचा पारा ४० अंशावर पोहोचल्याने उकाड्याने जळगावकर हैराण झाला होता. मात्र मागच्या काही दिवसापासून वातावरणात अचानक बदल झाला. राज्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तविला होता. त्यानुसार मागच्या दोन दिवसापासून राज्यात विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असून काही ठिकाणी गारपिटही होत आहे.

दरम्यान, जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढावले असून यामुळे तापमानात घट झाली आहे. गेल्या २४ तासात कमाल तापमानाचा पारा ३६ अंश इतका होता. काल बुधवारी सायंकाळी जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. यानंतर आजचा दिवस देखील जिल्ह्यासाठी महत्वाचा असणार आहे. कारण हवामान विभागाने आज १९ मार्च रोजी जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी (१९ मार्च) दुपारी ३ वाजल्यानंतर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना या काळात घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज असल्याने, या काळात झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत आश्रय न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रब्बी पिकांना फटका बसण्याची भीती

दरम्यान, सध्या अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या शेतात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी आणि मका ही पिके काढणीला आली आहेत. ऐन काढणीच्च्या वेळीच निसर्गाचा कोप होणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केली आहे, त्यांनी सुरक्षित साठवणुकीसाठी धावपळ सुरू केली आहे. मात्र, अद्याप शेतात उभ्या असलेल्या पिकांचे काय होणार, या भीतीने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now