⁠ 
शनिवार, सप्टेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दुहेरी पदवीची संधी ; जळगाव विद्यापीठाच्या विद्यापरिषदेत निर्णय

आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दुहेरी पदवीची संधी ; जळगाव विद्यापीठाच्या विद्यापरिषदेत निर्णय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२४ । नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी दुहेरी पदवीची संधी प्राप्त होणार आहे. आज दि. ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या बैठकीत या संदर्भातील मार्गदर्शक तत्वांना मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भात लवकरच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाशी सामंजस्य करार केला जाणार आहे.

कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापरिषेदेची बैठक झाली. प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यावेळी उपस्थित होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार एकावेळी अनेक कौशल्य संपादन करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यापुर्वी एकाच वेळी दोन अभ्यासक्रम करण्याची परवानगी विद्यार्थ्यांना नव्हती आता विद्यार्थ्याला एकाच वेळी दोन पदविका/पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमाची निवड करता येईल. मात्र एकाच वेळी दोन पदवी घेतांना त्यांच्या वर्गाच्या वेळा वेगवेगळ्या असाव्या लागतील. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाशी सामंजस्य करणार असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मुख्य पदवीसाठी प्रवेशित विद्यार्थी मुक्त विद्यापीठाच्या ओपन / डिस्टन्स लर्निंग ऑनलाईन मोडमध्ये करू शकणार आहेत. त्यासंदर्भातील अभ्यासक्रम निश्चित करण्यात आले आहेत. विज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य एस.एस. राजपूत यांनी या संदर्भातील माहिती विद्यापरिषदेच्या बैठकीत दिली. कबचौ उमवितील प्रवेशित विद्यार्थ्यांना आपली मुळ कागदपत्रे या विद्यापीठाकडे जमा करावे लागतील तर मुक्त विद्यापीठाकडे प्रवेश घेतांना कबचौ उमविचे बोनाफाईड आणि विद्यापीठाकडून साक्षांकित केलेली कागदपत्रे तसेच १०० रूपयांचे घोषणापत्र द्यावे लागेल. विद्यापरिषदेच्या बैठकीत यावर एकमताने निर्णय घेण्यात आला.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ अनुदान आयोगाचे स्वयम नियमन -२०२१ स्वीकारण्याचा निर्णय विद्यापरिषदेने घेतला. यानुसार विद्यार्थ्यांना आपल्या एकूण क्रेडिट पैकी जास्तीत जास्त ४०% क्रेडिटस् स्वयम कोर्सेस मोफत मिळवता येतील. या कोर्सेसची परीक्षा विद्यापीठ पातळीवर सुध्दा घेता येणार आहे. पहिल्यांदा विद्यापीठ परिसरातीत प्रशाळांमधील पदवी/ पदव्युत्तरचे विद्यार्थी आणि महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विद्यार्थी यांच्यासठी ही योजना राबवावी असे ठरले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू केली जाईल. या संदर्भातील कार्यप्रणाली विद्यापरिषदेने स्वीकारली. या बैठकीत इतर काही विषयांवर चर्चा होवून मान्यता देण्यात आली . कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी बैठकीचे सूत्रसंचालन करून शेवटी आभार मानले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.