अधिकचा नफा महागात पडला ! पाचोऱ्याच्या प्रौढाला असा लावला 33 लाखाचा चुना

मार्च 7, 2024 2:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२४ । फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत असून नागरिकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून हजारो लाखो रुपयाचा गंडा लावला जात आहे. आता अशीच एक घटना समोर आली आहे. पाचोऱ्याच्या एका ६५ वर्षीय व्यक्तीला शेअर खरेदी करून त्यातून अधिकचा नफा देण्याचे आमिष दाखवत त्यांची ३३ लाख ३० हजार १०० रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी जेसिका नाव सांगणाऱ्या व्यक्तीविरुद्ध ५ मार्च रोजी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud jpg webp

पाचोरा येथील व्यापारी असलेले रमेश शंकरलाल मोर (६५, रा. पाचोरा) यांना जेसिका नामक व्यक्तीने १९ जानेवारी ते २९ फेब्रुवारीदरम्यान वेळोवेळी संपर्क साधून एका कंपनीच्या शेअरचे नाव सांगितले. या शेअरची खरेदी केल्यास त्यातून अधिक नफा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यासाठी एका अॅपवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगून शेअर खरेदी करायला सांगितले. ते खरेदी केल्यानंतर अॅपवरील खात्यावर वाढीव रक्कम दाखवून मोर यांचा विश्वास संपादन केला. त्या माध्यमातून वेळोवेळी ३६ लाख १०० रुपये ऑनलाइन स्वीकारले. त्यापैकी दोन लाख ७० हजार रुपये परतावा दिला. मात्र उर्वरित ३३ लाख ३० हजार १०० रुपये न देता फसवणूक केली.

या प्रकरणी मोर यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now