जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२४ । हल्लीच्या काळात फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढत चालल्या असून याद्वारे सायबर ठगांकडून अनेकांना गंडा घातला जात आहे. अशातच यावलमधून फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावल येथील एका वृध्द दाम्पत्याची एक लाख तीस हजारात फसवणूक झाली.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दाम्पत्याने यावल पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

नेमका प्रकार काय?
परिवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त कर्मचारी निवृत्ती वामन पाटील (वय ५९), पत्नी पोर्णिमा पाटील शहरातील विस्तारित भागात राहतात. तर त्यांचा मुलगा निखिल (वय २८) एरोली (मुंबई) येथे एका खासगी कंपनीत अभियंता आहे. निवृत्ती पाटील यांना बुधवारी सकाळी व्हॅट्सअॅप कॉल आला.

‘मी सीबीआयचा अधिकारी बोलतोय. गैरकृत्य केल्याप्रकरणी तुमच्या मुलाला आम्ही ताब्यात घेतले आहे. त्याला तत्काळ सोडवायचे असेल तर तुम्ही दीड लाख रुपये द्या’ अशी धमकी व्हॉटस्अॅप कॉलव्दारे निवृत्ती पाटील यांना देण्यात आली. त्यांना मुलाची बनावट ऑडिओ क्लिप देखील ऐकवली. यामुळे घाबरलेल्या दाम्पत्याने संबंधितांना फोन पे द्वारे १ लाख ३० हजार रुपये पाठवले.
पैसे पाठवल्यानंतर तत्काळ त्यांनी मुलाला कॉल केला. तेव्हा मुलाने आपण मुंबई येथे सुरक्षित आहोत, अशी कुठली घटना घडली नव्हती, असे सांगताच आपली फसवणूक झाल्याचे वृद्ध दाम्पत्याच्या निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी ऑनलाइन तसेच यावल पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध फिर्याद दिली







