दोन सख्ख्या भावंडांना खासगी बसने चिरडले, एकाच मृत्यू, दुसरा गंभीर

डिसेंबर 5, 2021 10:17 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । जामनेर तालुक्यातील देऊळगाव येथे शाळेत जाण्यासाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावंडांना खासगी बसने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. यात पाच वर्षीय आर्यन नसीब तडवी (वय ५ वर्ष) चिमुकल्याचा मृत्यू झाला तर त्याचा अडीच वर्षीय भाऊ रेहान नसीब तडवी हा गंभीर जखमी झाला आहे.  जखमी बालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी खासगी वाहनांची तोडफोड केली. पहुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून पुढील कारवाई सुरू आहे.

deulgaon accident

याबाबत असे की, धामणगावकडून जामनेरला जाणाऱ्या बालाजी ट्रॅव्हल्स ही खाजगी बस (क्र. एम.एच- २१ -बी.एच.- ०६४७) प्रवाशांना घेऊन निघाली होती.  मात्र वाटेत देऊळगाव गुजरी येथे रस्त्याने शाळेत पायी जात असलेल्या रिहान तडवी आणि आर्यन तडवी या दोन भावंडांना बसने धडक दिली. यात चाकाखाली आल्याने दोन्ही भावंडे जखमी झाली आहेत. दोघांना उपचारार्थ बुलडाणा येथे नेते असताना आर्यनचा वाटेतच मृत्यू झाला. रिहान याची तब्येत गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

अपघातानंतर गावातील जमावाने बसची तोडफोड केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक अरुण धनवटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचोरा येथूनही अतिरिक्त पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, लहान मुलांना धडक देणार्‍या बसचा चालक आणि क्लिनर यांना जमावाच्या तावडीतून पोलिसांनी सुरक्षित ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी पहुर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now