यावल येथे दुचाकी व ट्रकच्या अपघातात एक ठार, एक गंभीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२१ । दुचाकी व ट्रकच्या झालेल्या अपघातात एक जण ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना यावल येथील भुसावळ नाक्याजवळ घडली. शेख शकील शेख ईबा असे मृताचे नाव आहे. तर मेहमूदखान फकिरखान (५२) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाहनासह चालकास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत असे की, यावल ते भुसावळ मार्गावरील जुने भुसावळ नाक्यावर २५ जुलै रोजी सकाळी अकराला यावलहून भुसावळकडे जात असलेल्या एमएच-१९-बी-२१८७ या आपल्या मोटारसायकलने यावल येथील आठवडे बाजार परिसरातील राहणारे शेख शकील शेख ईबा, (मिस्त्री) (वय ४७) व दहिगाव येथील मेहमूदखान फकिरखान (५२) हे दोन्ही बांधकाम कारागीर भुसावळकडे कामाला जात होते. तेव्हा भुसावळहून यावलच्या दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने मोटारसायकलला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात शेख शकील शेख ईबा यांना उपचारार्थ येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, घटनास्थळावरून पसार झालेला अपघातास कारणीभूत ट्रक अंजाळे गावाजवळ नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आला. ट्रकचालक सुधीर रमेश आसुरकर रा.वणी, जि. यवतमाळ यास वाहनासह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.