सोमवार, डिसेंबर 4, 2023

हृदयदायक! ‘तू इथंच थांब’.. म्हणत मुलासमोरच पित्याने घेतली विहिरीत उडी

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२३ । जळगावमधील ममुराबाद येथे एक हृदयदायक घटना घडली आहे. मुलादेखत पित्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. १० वर्षाच्या चिमुकल्याने शेजारील शेतात काम करणाऱ्यांना शेतकऱ्यांना आरडाओरड करत माहिती दिल्यानंतर घटना समोर आली आहे. समाधान भास्कर कुंभार (वय ३८) असे मयत पित्याचे नाव असून समाधान यांच्या आत्महत्ये मागचे नेमके कारण समोर आलेले नाही.

ममुराबाद शिवारातील विटभट्टीवर जावून समाधान कुंभार यांनी ऑर्डरनुसार ट्रॅक्टरमध्ये विटा भरल्या. त्यानंतर जळगाव येथील एका बांधकामाच्या ठिकाणी विटांची ऑर्डरप्रमाणे ट्रीप खाली केली. जळगाव शहरात विटांचा माल टाकून आल्यानंतर परत ममुराबादकडे येत असतांना, समाधान यांनी ट्रॅक्टर रस्त्यालगत ममुराबाद शिवारातील म्हाळसादेवी मंदिराकडे उभे केले. त्याठिकाणी काही मिनीटात येतो..‘तू इथंच थांब’ असे समाधान यांनी मुलागा वैभव याला सांगितले.

वैभव टक लावून बघत असताना, अचानक वडिलांनी विहिरीत उडी घेतल्याने तोही विहिरीच्या दिशेने पळाला. शेजारीच शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आरडाओरड करत घटनेची माहिती दिली. मुलाच्या आवाजाने शेतकरी धावत विहिरीजवळ आल्यानंतर यात समाधान यांनी उडी मारुन आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळविली.

सकाळपासून ते सायंपर्यंत विहिरीत शोध सुरू होता आणि चिमुरडा आपले वडील कधी पाण्यातून बाहेर येतात, म्हणून विहिरीत डोकावत राहिला. अखेर सायंकाळी पित्याचा मृतदेह बघताच चिमुरड्याने धायमोकलून रडायला सुरवात केली अन्‌ ग्रामस्थांचेही डोळे पाणावले.