जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । यावल तालुक्यातील विरावली येथे सुट्टीवर आलेल्या सैनिक महेंद्र पाटील यांनी गावातील तरुणांना व्यायामाचे धडे दिले. हिवाळा आपल्या शरीरासाठी अति उत्तम असून या दिवसात पहाटे खुल्या हवेत व्यायाम केल्यास शरीर सुदृढ होते. सैन्य आणि पोलिस भरतीसाठीच्या तयारीकरिता हा व्यायाम उपयुक्त ठरतो, असा कानमंत्र देत गावातील तरुणांना ते भरती पूर्व मार्गदर्शन करत आहेत.
सैनिक सुट्टीवर घरी आला तरी तो आपल्या कार्यापासून सुट्टी घेत नाही याचा प्रत्यय विरावलीतील सैनिक महेंद्र पाटील यांच्यारुपाने आला. सध्या सुट्टीवर गावी आलेल्या महेंद्र पाटील यांनी गावातील तरुणांना एकत्र करून हिवाळ्यात पहाटे करावयाच्या व्यायामाचे महत्त्व सांगितले. तरुणांना व्यायामाचे सवय झाली पाहिजे. त्यांनी हिवाळ्यात पहाटे स्वतःहून उतून व्यायाम केला पाहिजे, या साठी ते प्रवृत्त करत आहेत. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामाचे महत्त्व ते विशद करून सांगतात.
आज करत असलेला व्यायाम भविष्यात आपले शरीर व करिअर यासाठी किती महत्त्वाचा आहे याचे महत्त्वही ते तरुणांना सांगतात. सैन्य व पोलिस भरतीसाठी आज केलेला व्यायाम उद्या उपयोगी पडू शकतो. शरीराला आळस येणार नाही अशा दृष्टीने आपल्या जीवनात व्यायामाचे महत्त्व असल्याचे ते सांगतात. गावातील तरुणांना ते सैन्य व पोलिस भरती पूर्व मार्गदर्शन सध्या करत आहेत. प्रत्येक सैनिकाने सीमेवरून गावी आल्यानंतर आपापल्या भागातील तरुणांना मिळेल त्या वेळेत मार्गदर्शन केले पाहिजे. कारण ही तरुण पिढी देशाचे भविष्य असल्याचेही ते म्हणाले.