⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

सुप्रीम कोर्टाचा शिवसेनाला मोठा दिलासा ; निवडणूक आयोगाला दिले हे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२२ । राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून आज पुन्हा एकदा दोन्ही बाजूच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. तसंच निवडणूक आयोगाकडूनही याप्रकरणी बाजू मांडण्यात आली आहे. त्यानंतर शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या दाव्याबाबत निकाल येईलपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, पक्षाच्या चिन्हावर निर्णय घेऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्याच्या सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. 

बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे तसेच विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक, राज्यपालांनी एकनाथ शिंदे आणि भाजपाला दिलेली सत्ता स्थापनेची परवानगी, नव्या सरकारने सिद्ध केलेले बहुमत अशा विविध प्रकरणात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकांवर काल बुधवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर आज पुन्हा या प्रकरणाची सुनावणी झाली. हे प्रकरण खंडपीठाकडे देऊ नये, असे शिवसेनेच्या वताने वकील कपील सिब्बल म्हणाले होते. यावर लवकरच निर्णय घेणार, असे कोर्टाने म्हटले.

आम्हीच खरा शिवसेना पक्ष आहोत, असा दावा शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आला आहे. याबाबत आयोगाने लगेच कोणताही निर्णय घेऊ नये, अशा सूचना कोर्टाने दिल्या आहेत. त्यामुळे आता सोमवारी सुप्रीम कोर्टात नेमकं काय होतं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.