जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२५ । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदावरून राजकारण तापले असून विद्यमान सभापती श्यामकांत सोनवणे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. सोनवणे यांच्या विरुद्ध १३ संचालकांनी अविश्वास ठराव आणला आहे. तसेच महायुतीचे १३ संचालक सहलीवर रवाना झाल्याची माहिती समोर आलीय. यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप महायुतीचा सभापती करण्यासाठी हालचालींना वेग आला असल्याचे चित्र समोर आले.

२०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत ११ जागा जिंकत महाविकास आघाडीने बाजार समितीत सत्ता मिळवली होती. यात सभापतिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. राजकीय नाट्यानंतर सोनवणे सभापती झाले होते.

सत्ता स्थापनेवेळी सोनवणे यांना फक्त एक वर्षांचा कार्यकाळ देण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात, दोन वर्ष उलटल्यानंतरही सोनवणे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे सर्व संचालकांमध्ये नाराजीची भावना पसरली असताना, अखेर सभापती श्यामकांत सोनवणे यांच्या विरोधात १३ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. त्यावर आता १२ तारखेला निर्णय देण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
सभापती सोनवणे हे चोपड्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे लहान बंधू आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठाही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे संचालकांचे बंड शमविण्याचे प्रयत्न होऊ शकतात.
या १३ संचालकांनी केले आहे बंड…
दिलीप कोळी, सुनील महाजन, मनोज चौधरी, लक्ष्मण पाटील, संदीप पाटील, जयराज चव्हाण, योगराज सपकाळे, अरुण पाटील, पांडुरंग पाटील, हेमलता नारखेडे, पल्लवी देशमुख, समाधान धनगर, प्रभाकर सोनवणे.
आठ वर्षात तिसऱ्यांदा अविश्वास?
गेल्या काही वर्षांमध्ये बाजार समितीचे राजकारण तापलेले दिसून येत आहे. कारण गेल्या ८ वर्षात बाजार समितीत ३ वेळा अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. २०१७ मध्ये तत्कालीन सभापती प्रकाश नारखेडे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता. त्यानंतर त्यांनी आपला पदाचा राजीनामा दिला होता. २०१२ मध्ये लक्ष्मण पाटील (लकी टेलर) यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यात आला होता. आता शामकांत सोनवणे यांच्या विरुद्धदेखील अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे.








