अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

एप्रिल 8, 2026 10:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जन्मतःच गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या नवजात शिशुचे प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून वाचविले. अन्ननलिका आणि श्वासनलिका एकमेकांना चिकटल्याने निर्माण झालेल्या दुर्मिळ ट्रकीओ-इसोफेजियल फिस्टुला या आजारावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे शिशुला नवजीवन मिळाले. याबाबत माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील प्रकाश भोई यांना बाळ झाले.

New Project 6

जन्मानंतर लगेचच शिशुच्या तोंडातून सतत फेस येत असल्याचे पालकांच्या लक्षात आले. तसेच शिशुला दूध पाजताना अडचण निर्माण होत होती. परिस्थिती गंभीर वाटल्याने शिशुला तत्काळ जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांनी प्राथमिक तपासणी करताना शिशुला अन्ननलिकेचा गंभीर विकार असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर बालरोग तज्ज्ञ व शल्यचिकीत्सकांच्या टीमने शिशुची सखोल तपासणी केली. एक्स-रे सह विविध तपासण्या करण्यात आल्या. तपासणीदरम्यान शिशुला ट्रकीओ-इसोफेजियल फिस्टुला हा जन्मजात आजार असल्याचे स्पष्ट झाले.

या आजारात अन्ननलिका आणि श्वासनलिका एकमेकांना चिकटलेल्या असल्यामुळे अन्न किंवा दूध पोटात जाण्याऐवजी श्वासनलिकेत जाण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे शिशुच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग शल्यचिकीत्सक डॉ. मिलींद जोशी, यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शल्यचिकीत्सकांनी ट्रकीओ-इसोफेजियल फिस्टुला रिपेयर या अत्यंत नाजूक पद्धतीचा वापर करून शस्त्रक्रिया केली.

सुमारे दीड तास चाललेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान अन्ननलिका आणि श्वासनलिका वेगळ्या करण्यात आल्या व त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी डॉ. शुभम कालरा, डॉ. प्रज्योत कदम, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शीतल, डॉ. मारीया यांनी सहकार्य केले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर नवजात शिशुला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. याठिकाणी विभागप्रमुख डॉ. अनंत बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. सुयोग तन्नीरवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. उमाकांत अणेकर यांच्या टीमने शिशुची सतत काळजी घेत आवश्यक उपचार दिले.

डॉक्टरांच्या दक्ष देखरेखीमुळे शिशुची प्रकृती धोक्याबाहेर आली. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शल्यचिकीत्सक व बालरोग तज्ज्ञांच्या समन्वयातून करण्यात आलेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे नवजात शिशुला नवजीवन मिळाले आहे. कोट.. ट्रकीओ-इसोफेजियल फिस्टुला हा नवजात शिशूमध्ये आढळणारा दुर्मिळ पण गंभीर आजार आहे. वेळेवर निदान आणि तातडीची शस्त्रक्रिया केल्यास शिशुचे प्राण वाचवता येतात. या शिशुच्या बाबतीत पालकांनी वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे उपचार करणे शक्य झाले. – डॉ. प्रज्योत कदम, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now