जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२५ । यावल तालुक्यातील दहिगाव येथील इम्रान युनूस पटेल (२१, रा. हनुमंतखेडा, ता. धरणगाव) या २१ वर्षीय युवकाच्या हत्येप्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. मयत तरुणाने तिच्या प्रेमसंबंधांची माहिती तिच्या पालकांना दिली होती. या रागातून तिनेच संशयितांना खुनासाठी चिथावणी दिल्याचे समोर आले.

दहिगाव येथील सुरेश आबा नगरातील रहिवासी इम्रान पटेल याची २९ ऑगस्टला रात्री ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय १९) व गजानन रवींद्र कोळी (वय १९ दोन्ही रा. सुरेश आबा नगर, दहिगाव) या तरुणांनी कोयत्याने वार करून हत्या केली होती. त्यानंतर दोन्हीही पोलिसांना शरण आले होते. या गुन्ह्यात त्यांच्या सोबत यावल शहरातील सुतार वाडा भागातील रहिवासी तुषार राजेश लोखंडे उर्फ जन्नत (वय १९) याचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

याबाबत पोलिसांनी नागपूर येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीकडे चौकशी सुरू होती. सखोल तपासानंतर दहिगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा या खुनाशी संबंध असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीकडे संशयाने पाहिले गेले. तपासादरम्यान तिच्या विरोधात पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
तिच्या प्रेमसंबंधांची माहिती इम्रान याने तिच्या पालकांना दिली होती. तिनेच वरील दोघांना खुनासाठी चिथावणी दिल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बालिकेला ताब्यात घेत जळगाव येथील विशेष बाल न्याय मंडळासमोर हजर केले. तिला बाल अधिरक्षा कक्षात ठेवले आहे. या गुन्ह्यातील तिघं संशयित न्यायालयीन कोठडी आहे. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळेच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल महाजन तपास करता आहे.











