मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘त्या’ 12 आमदारांची नवी यादी तयार, आज राज्यपालांची भेट घेणार
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून देण्यात आली होती. ती यादी अखेरीस रद्द करण्यात आली आहे. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही 12 नावांची यादी मागे घेण्याचे पत्र राज्यपालांना लिहिले होते. त्यानंतर राज्यपालांनी अखेरीस ही यादी मागे घेण्यास मंजुरी दिली आहे. मात्र आता मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी नव्या 12 आमदारांची यादी तयार केली असून ती यादी राज्यपालांना देणार आहे. त्यासाठी त्यांनी राज्यपालांना भेटण्यासाठीची आज वेळ मागितला आहे.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी असताना विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 आमदारांची नावे राज्यपालांना पाठवली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आलेल्या 12 जणांच्या नावांच्या यादीला राज्यपालांनी मंजुरीही दिली नव्हती, तसेच त्यांनी ही यादी फेटाळलीही नव्हती. ही 12 नावांची यादी राज्यपालांकडे गेली दोन वर्षे पडून होती. त्यांनी या 12 सदस्यांना विधान परिषद आमदारकी दिलीच नाही.
शिवसेनेत झालेल्या बंडानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपा यांनी राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर, दोन महिन्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 नावांची यादी मागे घेण्याचे पत्र राज्यपालांना लिहिले होते. त्यानंतर राज्यपालांनी अखेरीस ही यादी मागे घेण्यास मंजुरी दिली आहे. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने 12 आमदारांची यादी पाठवणार असल्याची माहिती आहे. मात्र त्यात कुणाला संधी मिळणार आहे हे अद्यापही समोर आलेली नाहीय.