मोठी बातमी : जिल्हा दूध संघाच्या एमडींना अटक!

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । जळगाव जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या काही दिवसापासून पोलीस तपास सुरू होता. दरम्यान, सोमवारी सायंकाळी दुध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेल्याचे समजते.

जळगाव जिल्हा दुध संघात मध्यंतरी राज्य सरकारने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची नियुक्ती केली होती. यात मुख्य प्रशासकपदी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह अन्य दहा प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. तर विद्यमान संचालक मंडळाने या निर्णयाला न्यायालयातून स्थगिती मिळविली होती. दरम्यानाच्या कालखंडात या प्रशासक मंडळाने कागदपत्रांची झाडाझडती घेऊन दुध संघात अपहार झाल्याचे शोधून काढले होते. यात दुध आणि लोणी यांच्या विक्रीत अपहार झाल्याची फिर्याद देण्यात आली होती. तर संचालक मंडळाने हा अपहार नसून चोरी असल्याचा युक्तीवाद करून दुसरी तक्रार नोंदविली होती. यासाठी आमदार एकनाथराव खडसे यांनी शहर पोलीस स्थानकात ठिय्या आंदोलन केले होते.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्मचार्‍यांवर जबाब बदलण्यासाठी पोलीस दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच पोलिसांनी फिर्याद दाखल न करून घेतल्याने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत न्यायालयाने राज्याचे गृह सचिव आणि इतर अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याची माहिती आ.एकनाथराव खडसे यांनी दिली होती. यानंतर आज दुध संघासाठी अर्ज छाननी करण्यात आल्यानंतर रात्री दुध संघाचे कार्यकारी संचालक (एमडी) मनोज लिमये यांना शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी तत्कालीन अध्यक्ष अथवा अन्य कुणा संचालकांवर देखील याच प्रकारची कार्यवाही होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आल्याचे समजते.