धुळ्यातील NDRF पथकाची बोट बुडाली, जळगावच्या जवानासह तीन जण शहीद

मे 23, 2024 5:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२४ । अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीत बुडालेल्या लोकांच्या शोधासाठी गेलेली धुळ्यातील एसडीआरएफ पथकाची एक बोट बुडाली. या दुर्घटनेत दोन जवानांसह एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरम्यान मृत जवानांमध्ये जळगाव जिल्ह्यातील एका जवानांचा समावेश आहे.

प्रवरा नदीत jpg webp

वैभव सुनील वाघ असं या मृत जवानाचे नाव असून ते भडगाव तालुक्यातील पांढरद येथील रहिवासी आहे. वैभव वाघ हे राज्य आपत्ती दलातील पोलीस शिपाई पदावर कार्यरत होते.

याबाबत असे की, काल बुधवारी दुपारी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीपत्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले (25) व अर्जुन रामदास जेडगुले (18) हे दोघे तरुण बुडाले होते. त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह बुधवारी सापडला तर अर्जुन जेडगुले याचा शोध सुरू होता. या तरुणाचा शोध घेण्यासाठी धुळ्यातील एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

या तरुणाचा तपास सुरू असतानाच एसडीआरएफ पथकाची बोट आज गुरुवारी सकाळी उलटली. या बोटमध्ये पथकातील चार जण आणि स्थानिक असे पाच जण प्रवरा नदी पात्रात बुडाले. यातील तीन जणांचे मृतदेह सापडले असून अन्य दोन जणांचा शोध सुरू आहे. धुळे एसडीआरएफ बलगट क्रमांक 6 चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पोलिस शिपाई वैभव वाघ व पोलीस शिपाई राहुल पावरा या तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, वैभव वाघ यांचे आठ वर्षा पुर्वी लग्न झाले होते आणि भडगाव तालुक्यातील मोठा मित्र परिवार होता. आज त्यांच्या वीर मरणाची बातमी येताच परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगी,एक मुलगा असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now