राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२३ । बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीला अपघात (Car Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली असून या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असली तरीही त्यांना मुंबईत पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. धनंजय मुंडे यांना परळीतून लातूर येथे नेलं जाईल. त्यानंतर विशेष विमानाने त्यांना मुंबईत पुढील उपचारांसाठी हलवलं जाईल, अशी माहिती खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता, विश्रांतीचा सल्ला
धनंजय मुंडे यांच्या गाडीला रात्री तीन वाजेच्या सुमारास अपघात झाला, मात्र याची माहिती आज सकाळपर्यंत फारशी कुणाला नव्हती. आज सकाळी अपघाताची बातमी शहरभर पसरली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.