महामार्गावर घसरली दुचाकी, पित्याचा मृत्यू, मुलगी जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२१ । शहरातील अपघातांची मालिका थांबत नसून खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव जात आहे. भुसावळहून जळगावला दुचाकीने येत असताना दुचाकी घसरून पित्याचा मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाल्याची घटना खेडीजवळ झाली.

भुसावळ येथील रहिवासी प्रकाश शाम जोशी (वय ४६) हे मुलगी आदिती (वय-१८) हिच्या सोबत दुचाकीने जळगावी भाच्याकडे येत होते. तर, त्यांची पत्नी आणि दोन मुली या रेल्वेनेच जळगावकडे येण्यासाठी निघाल्या होत्या. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास प्रकाश जोशी हे खेडीजवळ आले असतांना त्यांची गाडी अचानक स्लीप झाली. यामुळे ते आपल्या मुलीसह महामार्गावर कोसळले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांची मुलगी आदिती ही जखमी झाली असून तिला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रकाश जोशी हे जळगाव येथील एका सहकारी बँकेत कामाला होते. या अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.