जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२६ । जळगावचा नशिराबाद येथून खळबळजनक घटना समोर आलीय. कौटुंबिक वादातून पतीने दारूच्या नशेत आपल्याच पत्नीची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. मंदाबाई जाधव असं मृत महिलेचं नाव असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मंदाबाई या नशिराबाद येथील रहिवासी रामा सोमा बागले यांच्या कन्या होत्या. त्यांचा विवाह रायपूर येथे झाला होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नी नशिराबाद येथे वास्तव्याला आले होते. रविवारी दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद सुरू असतानाच पती विकास जाधव याने दारूच्या नशेत घरात असलेला कोयता घेऊन मंदाबाई यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. यावेळी कोयत्याचा थेट वार मानेवर बसल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंदाबाई यांचा घटनास्थळीच जागीच मृत्यू झाला.

हत्येच्या या थरारक घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, गुन्ह्यानंतर आरोपी पती विकास जाधव हा घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.









